
नोकरीत सामावून घ्या! कोयना प्रकल्पगस्तांचे उपोषण
चिपळूण : प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून न घेतल्याने चिपळूण व पाटण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांनी पोफळी येथील ‘महाजनको’च्या कार्यालयासमोर रविवारपासून उपोषण सुरू केले आहे. चिपळूण कोयना वीज प्रकल्प अंतर्गत नोकर्या देण्यात आलेल्या नाहीत. कोयना वीज प्रकल्पासाठी चिपळूण व पाटणमधील लोकांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी गेल्या. शासनाने त्यावेळी फारसा मोबदला न देता या जमिनी ताब्यात घेतल्या तर काहींचे ठिकठिकाणी पुनर्वसन केले. काहींना लाभ मिळाला. जागा उपलब्धतेनुसार नोकर्या देखील देण्यात येत होत्या. मात्र, 2017 मध्ये ही योजना बंद करण्यात आली. यामुळे प्रकल्पग्रस्तांना कोयना वीज प्रकल्पात सामावून घेणे अडचणीचे होत आहे. अनेक प्रकल्पग्रस्तांकडे दाखले असून त्यांना या प्रकल्पात नोकरी देण्यात येत नाही. त्यामुळे गेले कित्येक दिवस लढा सुरू होता. या संदर्भात अनेकवेळा शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला, बैठका घेण्यात आल्या. अखेर आता या प्रकल्पग्रस्तांनी उपोषण सुरू केले आहे. माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.कोंडफणसवणे, अलोरे, पोफळी, शिरगाव, कोळकेवाडी, पाटण तालुक्यातील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.