आधी मुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी उपकेंद्र सक्षम करा आणि मगच मा. कै. धनंजयराव कीर यांचे नाव द्या.
ॲड. धनंजय ज.भावे. रत्नागिरी- ९४२२०५२३३०.
कोकण विद्यापीठ की उपकेंद्र या चक्रव्युहात असल्याचे भासवून ना. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री काहीही करत नाहीत असे लक्षात आले आहे. गेल्या वर्षीच ही मागणी त्यांचेकडे करण्यात आली होती. पण त्यांना कदाचित विद्यापीठाच्या अन्य गोष्टीत रस असावा म्हणून उपकेंद्राच्या सक्षमतेविषयी त्यांनी दुर्लक्ष केले असावे असे वाटते. मग आला कोरोना. मग आली परीक्षा…मग काय घडलं सर्वांनाच माहिती आहे. ते आपण विसरून जावूया…
आता आलीय मागणी उपकेंद्राला मा. कै. धनंजयराव कीर यांचे नाव देण्याची आणि ती भंडारी समाजाकडून.
उपकेंद्राच्या मागणीसाठी अनेकांनी प्रयत्न केले ज्या काळामध्ये उ आणि तं मंत्री महोदय कोणीच नव्ह्ते. आजपर्यंत ते उपकेंद्र सातत्याने उपेक्षितच राहिले आहे. आता कोकणचे सुपुत्र कुलगुरु झाल्यावर तरी ते सक्षम होईल या आशेने विद्यार्थी पहात होते पण तेही निदान आजवर तरी घडलेले नाही.
मागणी अशी होती की या उपकेंद्राला कायम स्वरूपी मुंबई विद्यापीठाच्या सेवेतील (केडरमधील) संचालक किवा किमान सहाय्यक सचीव दर्जाचा अधिकारी मिळावा. पण वेळोवेळी या भागातील कॉलेजचे प्राचार्य किवा तत्सम व्यक्तिची नेमणूक प्रभारी म्हणून झाली. आता ते कॉलेज सांभाळतील की उपकेंद्र हा साधा सवाल होता. शिवाय कॉलेजिसना विद्यापीठाशी किवा त्यांचे अधिकारी मंडळींशी जपूनच बोलायला हवे कारण कॉलेजवर राग निघायला नको.
आजही माझे माहितीप्रमाणे संचालकाची जागा प्रभारी आहे आणि तेथे मुंबई विद्यापीठाचा केडर मधील अधिकारी नाही. केडर मधील अधिकारी असेल तर तो हक्काने उपकेंद्र हाताळू शकतो हे सत्यच आहे. मा. कुलगुरु विद्यापीठाच्या स्वायत्त अधिकारांमध्ये संचालक नेमणूकी विषयी त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारामध्ये विद्यापीठाच्या केडरमधील संचालकाची किवा तत्सम अधिकारी व्यक्तिची नेमणूक करू शकतात असे वाटते. अशी नेमणूक झाल्यास रत्नागिरीचे उपकेंद्र खऱ्या अर्थाने सक्षम होईल आणि अशा केंद्रास मा. कै. धनंजयराव कीर यांचे नाव देणे खऱ्या अर्थाने उचित ठरेल. विद्यार्थ्यांना निरुपयोगी, अकार्यक्षम अशा उपकेंद्रास अशा थोर व्यक्तिचे नाव देणे मला तरी आवडणार नाही.