कळंबणी कोव्हिड रु्णालयातील रिक्त जागा कधी भरणार?कोरोनाग्रस्तांसह नातेवाईकांचा सवाल

खेड : उत्तर रत्नागिरीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्यानंतर खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे रुपांतर कोव्हिड रुग्णालयात करण्यात आले. शासनाचा हा निर्णय कोरोनाच्या महामारीत दिलासा देणारा आहे. मात्र या रुग्णालयातील रिक्त पदे भरली जात नसतील तर कोरोनाग्रस्तांवर उपचार कसे होणार? हा प्रश्न कोरोनाग्रस्त रूग्णांसह नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे.
जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. कोरोनाबाधीतांचा आकडा दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. रत्नागिरी जिल्हा देखील याला अपवाद नाही. गेल्या काही दिवसात कोरोनाबाधीतांची संख्या कितीतरी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड या तालुक्यातील कोरोनाबाधीतांवर तात्काळ उपचार करता यावे यासाठी खेड तालुक्यातील कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात कोव्हिड रुग्णालय सुरु करण्यात आले.
या कोव्हिड रुग्णालयात एक्सरे मशिन्स, वेन्टिलेटर्स यासारख्या सुविधा उपलब्ध असल्याने हे रुग्णालय रुगणांसाठी संजिवनी ठरणारे आहे. परंतू रुग्णालयात आवश्यक तो स्टाफ नसल्याने इथे कोरोना रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा असूनही ती हाताळायची कुणी? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.
रुग्णालय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णालयात एमडी फिजिशियन, फॉर्मासिस्ट, एक्सरे तंत्रज्ञ, पारिचारिका, सफाई कामगार अशी एकूण ३७ पदे रिक्त आहेत. यामुळे आरोग्य सेवा पुरविताना उपलब्ध अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त ताण येत आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे.
रुग्णालयात कोरोना रुग्णावर तातडीचे उपचार करण्यासठी चार एक्सरे मशिन्स, व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. परंतु ती हाताळण्यासाठी अधिकारी किंवा तंत्रज्ञच नसल्याने त्याचा रुग्णांना काहीही उपयोग होत नाही. कोरोना रुग्णांना तात्काळ आणि तातडीचे उपचार मिळावेत यासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाला कोव्हिड रुग्णालयाचा दर्जा देवून शासनाने कोरोना रुग्णांना दिलासा दिला आहे. परंतु जो पर्यंत रुग्णालयातील रिक्त जागा भरल्या जात नाहीत तो पर्यंत या रुग्णलयात कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे त्यामुळे शासनाने या रुग्णालयातील रिक्त जागा तात्काळ भरून कोरोना रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
www.konkantoday.vom

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button