
गुहागरमध्येही शिंदे गट होतोय मजबूत
गुहागर : तालुक्यात शिंदे गट सक्रिय होत असल्याच्या चर्चा आता येथील राजकारणात रंगू लागल्या आहेत.आगामी काळात शिंदे गटाची ताकद गुहागर तालुक्यात लवकरच दिसून येईल असे बोलले जात आहे.
अनेक वेळा गुहागर तालुक्यात शिंदे गट सक्रिय असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र, काही वेळा याला दुजोरा तर काही वेळा अफवा असे म्हटले गेले. येथील नाराज गट हा शिंदे गटाकडे विलीन होणार हे आता जोरदार चर्चिले जात असून, या गटाच्या भेटीगाठी उघड होत आहेत. सध्या केवळ पाठिंबा असे शिंदे गटाकडे कल असणार्यांनी सांगितले असले तरी प्रवेश पक्का असल्याचा दुजोरा देखील काहींनी दिला आहे.त्यामुळे गुहागरात आ. भास्कर जाधव यांचा असलेल्या वर्चस्वाला नक्कीच धक्का लागणार हे निश्चित आहे.
तालुक्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून शिवसेनेत असलेल्या पदाधिकारी, शिवसैनिकांचा कल शिंदे गटाकडे आहे. याची सुरवात काही शिवसैनिकांनी गणपती उत्सवात केली होती. शिंदे गटातील उद्योगमंत्री उदय सामंत गुहागरमध्ये अशासकीय दौर्यावर येऊन गेल्यानंतर या घडामोडींना वेग आला. नवरात्र उत्सव सुरु होण्यापूर्वी गुहागर तालुक्यातील काही शिवसैनिकांनी रत्नागिरीत जाऊन भैय्या सामंत यांची भेट घेतली. त्यानंतर नुकतेच खेडचे शशिकांत चव्हाण यांच्या माध्यमातून गुहागर तालुक्यातील 5 पदाधिकारी, 2 सरपंच भैया सामंतांना भेटले आणि शिंदे गटात जाणार हे जवळपास निश्चित
झाले.
गुहागरमधील शिंदे गट मजबूत करण्यासाठी शिंदे गटाचे नेते रामदास कदम गुहागरात येणार हे निश्चित आहे.त्यांना मानणारा मोठा गट गुहागर शिवसेनेत आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर हा गट सक्रीय राजकारणापासून दूर राहिला होता. रामदास कदम सक्रीय झाल्यानंतर पुन्हा हा गट सक्रिय होत आहे. गुहागर शिवसेनेत जुने नवे असे समीकरण आहे. त्यामुळे आगामी काळात गुहागरात शिंदे गट सक्रिय होणार हे निश्चित आहे.




