
चिपळूण तालुक्यातील पिंपळी-तीनवड येथे घरफोडी प्रकरणातील दीड लाखांचे दागिने हस्तगत.
चिपळूण तालुक्यातील पिंपळी-तीनवड येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी चिपळूण पोलिसांनी दोन चोरट्यांना कोल्हापूर येथून ताब्यात घेवून अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून दीड लाखाचे दागिने हस्तगत केले आहेत. दरम्यान त्या दोघांना सोमवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.पवन जयंत आंबेडे (२८, वालोटी, चिपळूण), ज्ञानेश्वर कृष्णात पाटील (२३, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.तालुक्यातील पिंपळी तीनवड येथे २ जानेवारी रोजी चोरट्यांनी एका घराची कौले काढून त्यातील रोख रक्कमेसह दागिने असा तब्बल १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला होता.
याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. चिपळूण पोलीस ठाण्यातील प्रकटीकरण पथकाकडून या चोरीचा तपास सुरू असताना तांत्रिक बाबींचा आधार घेत या पथकातील पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल वृषाल शेटकर, संदीप माणके, रोशन पवार, प्रमोद कदम, कृष्णा दराडे यांनी कोल्हापूर येथून पवन आंबेडे, ज्ञानेश्वर पाटील यांना ताब्यात घेत अटक केली.www.konkantoday.com