महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या घेण्यात आलेल्या अभिनंदन मुलाखतीत कोणते गौप्यस्फोट होणार याकडे लक्ष
महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीला ‘अभिनंदन मुलाखत’ असं नाव देण्यात आलं आहे. या मुलाखतीचा प्रोमो नुकतंच प्रदर्शित करण्यात आला. यात राज्यातील कोरोना स्थिती, भाजपाकडून होणारी टीका, सरकारसमोरील आव्हान याबाबतची भाष्य करण्यात आलं आहे. नुकतंच प्रदर्शित झालेल्या अभिनंदन मुलाखतीच्या प्रोमोमध्ये भाजपला रोखठोक इशारा देण्यात आला आहे.
संजय राऊत (प्रश्न) – हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल असे भाकीत करत आलेत?
➡️उद्धव ठाकरे (उत्तर) – असे म्हणणाऱ्यांचे दात पडत आलेत.
संजय राऊत (प्रश्न) – पण दात कसे पाडले तुम्ही?
➡️उद्धव ठाकरे (उत्तर) – सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही १० सूड काढतो.
संजय राऊत (प्रश्न) – पूर्णपणे, उघडपणे आणि निर्लज्जपणे महाराष्ट्रात अघोरी प्रयोग सुरु आहेत?
➡️उद्धव ठाकरे (उत्तर) – आमच्या आंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत, त्यांना त्यांना सांगू इच्छितो, की तुम्हाला देखील मुलबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाही. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो.
संजय राऊत (प्रश्न) – महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला कसं वाटत? महाराष्ट्र मोठं राज्य आहे, मग महाराष्ट्र हे आत्मनिर्भर कधी होणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा यापलिकडे काय करतात?
➡️उद्धव ठाकरे (उत्तर) – ठिक आहे, हात धुतो आहे , जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन.
संजय राऊत (प्रश्न) – तुमच्या जीवनात वर्षभरात काय बदल झाला ?
➡️उद्धव ठाकरे (उत्तर) – हे विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करु नका. पण विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला जास्त स्फूर्ती मिळते. कोणी कितीही आडवे आले तरी त्यांना आडवे करून महाराष्ट्र पुढे जाईल.
दरम्यान संजय राऊत यांनी यापूर्वीही उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली होती. त्यानंतर आता महाविकासआघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्तची त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली आहे. सामना या वृत्तपत्रातून ही मुलाखत प्रसिद्ध केली जाणार आहे. उद्या म्हणजेच (२७ नोव्हेंबर) ही मुलाखत प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे या मुलाखतीतून मुख्यमंत्री कोणकोणते गौप्यस्फोट करतात, कोणत्या विषयावर भाष्य करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
www.konkantoday.com