प्रसिध्दीपासून दूर राहिलेल्या प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्या—ताई भिंगार्डे !

0
567

अड. धनंजय जगन्नाथ भावे..९४२२०५२३३०

श्रीमती मंगला विश्वनाथ भिंगार्डे म्हणजेच सर्वदूर परिचित असलेल्या श्रीमती ताई भिंगार्डे यांचे काल वयाच्या ८९ व्या वर्षी वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले. आमचा शालेय मित्र सतीश भिंगार्डे याची आई आणि आमच्याच वर्गातील सध्याची सौ. अनुराधा बेर्डे हिची बहिण या नात्याने माझ्यासह अनेक मित्रांचे ताईंकडे विहारसमोरील घरामध्ये अनेकदा जाणे-येणे होते. तसे आम्ही त्यांना आमच्या लहानपणापासून ओळखत होतो. जयस्तंभाजवळील बालक मंदिराच्या त्या शिक्षिका. त्यामुळे त्यानाही लहान मुलांची आवड होतीच. मी टिळक आळीतील असल्याने आमच्या तेथील महिला मंडळाच्या बालक मंदिरामध्ये शिकलो. ताईंच्या हाताखालून अनेक विद्यार्थी शिकून गेले असतील आणि त्यांनाही आज ताईंची आठवण होऊन दु:खही झाले असेल. ताईंनी जवळपास ३० वर्षे नोकरी केली.

ताईंचा अनेकांशी उत्तम जनसंपर्क होता. समाजामधील विविध व्यक्तिंशी त्यांचा परिचय होता. मला आठवते की ताई तत्कालिन जनसंघ पक्षाचेही काम प्रसंगानुरुप करीत असत. परंतु  नोकरी करीत असतानांच त्यांनी रत्नागिरीमधील थोर समाजसेविका कुमुदताई रेगे यांच्या सान्निध्यात आल्याने लांजा येथील महिला आश्रमाचे काम एक सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारले होते. आणि याच कामातून त्यांचा एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सर्वांना अधिक परिचय झाला.

भिंगार्डे कुटुंबिय टिळक आळीमध्ये रहायला आले आणि मीही त्यांच्या शेजारीच दिक्षित वाड्यामध्ये रहाण्यास आलो त्यानंतरच खरे तर माझ्या कुटुंबाचा आणि ताईंचा रोजचा संबंध येऊ लागला. त्यांची नातवंडे आणि माझीही मुले ही बरोबरीने खेळत असत आणि ताईंना त्या सर्वांचेच कौतुक असे. मला त्यावेळच्या ताई अजूनही आठवतात. सकाळी देवाचे दर्शन , त्यानंतर बहुधा धार्मिक वाचन त्या करीत असत. दिक्षित वाड्याच्या बाजूच्या त्यांच्या घराच्या दरवाज्यामध्ये त्या काही ना काही उद्योगामध्ये त्या मग्न असायच्या. तेथूनच त्या गल्लीतून खेळणाऱ्या आमच्या लहान मुलांवर त्यांचे लक्षही असायचे.

आम्ही त्यांच्या शेजारी रहायला आल्यावरच त्यांच्या लांजा येथील महिलाश्रमाच्या कार्याविषयी आम्हाला अधिक जवळून परिचय झाला. कुमुदताईंच्या बरोबरीने ताईंनी त्या कामाला वाहून घेतले होते. आश्रम समितीच्या कार्यकारी मंडळाच्या त्या सभासदही होत्या. आजही कित्येकांना आठवत असेल की ताई अनेकदा अनेकांकडून जुने कपडे जमा करून आश्रमामध्ये एकतर स्वत: नेत असत किवा पाठवून देत असत. अगदी अलिकडे पर्यंत ताईंचे हे कार्य अव्याहतपणे चालू होते.

ही जबाबदारी पार पाडीत असतांना त्यांनी वेळोवेळी कौटुंबिक जबाबदारीही मोठ्या धीराने पार पाडली. ताईंनी जशी सर्व सामान्य परिस्थिती अनुभवली, त्याचबरोबर चांगले आर्थिक परिस्थितीचे दिवसही अनुभवले. विशेष म्हणजे  श्री. विश्वनाथशेठ यांचा अकाली मृत्यु, मोठया प्रथम सुनेचाही दुर्दैवी मृत्यु, मुलगा सतीशचा अकाली मृत्यु आणि सर्वात दु:खद असा नातू श्रेयसचा अकाली मृत्यु हे सहन करण्याची अतिशय वाईट वेळ ताईंवर वेळोवेळी आली. पण त्यातूनही या घटनांना स्वत: आणि कुटुंबियांना धीर देत त्यानी सर्व भिंगार्डे कुटुंबाचाच संसार उभा ठेवला आणि त्या त्या वेळच्या परिस्थितीवर मात केली. या सर्व दुर्दैवी घटनांचा मी अनेकांबरोबरच साक्षीदार आहे.

समाजामध्ये काही व्यक्ति अशा प्रकारचे जीवन जगत असतात की त्यांच्या हयातीमध्ये त्यांचा चांगुलपणा, त्यांचा नम्रपणा, त्यांचे समाजामधील अस्तित्व आणि त्यांचे समाजाप्रतीचे सामाजिक जबाबदारी ओळखून केलेले काम सर्वसामान्यांच्या नजरेत येत नाही. ताईंचे समाजकार्य हे गेली अनेक वर्षे कोणत्याही प्रसिध्दीपासून सदैव दूरच राहिले आणि नेमके हेच त्यांच्या समाजकार्याचे वैशिष्ट्य आहे आणि त्याचेच मला आजही अप्रूप वाटते. परमेश्वर अशा व्यक्तिंना सदगती देणार नाही तर कुणाला देणार ? आपले अस्तित्व न दाखवता निरलसपणे, गरजूंना मदत करण्याच्या सामाजिक जाणीवेने समाजकार्य करणाऱ्या आणि त्याचबरोबर यशस्वीपणे कौटंबिक जबाबदारीही पार पाडणाऱ्या आताशा दुर्मिळ होत चाललेल्या व्यक्तिंपैकी एक ताईं होत्या यात शंकाच नाही. कै. ताईंना विनम्र श्रध्दांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here