
मानधन मागण्यासाठी गेलेल्या कर्मचार्यास राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकार्याची मारहाण; सुमारे 40 हजार थकवले
रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्क विभागातील (एक्साईज) भरारी पथकात मदतनीस कर्मचारी म्हणून काम करणार्यास त्याचे चार महिन्याचे मानधन देण्याऐवजी मारहाण करणार्या अधिकार्यास हे प्रकरण भोवणार आहे. मारहाण झालेली व्यक्ती परवटणे येथे राहणारी असून, येथील राजकीय नेते आणि स्थानिक मंडळी संतप्त झाली आहे.
भरारी पथकातील एका अधिकार्याचे मदतनीस म्हणून काम करणार्या व्यक्तीला त्या अधिकार्याने मारहाण केली. त्यांचे चार महिन्याचे मानधन त्या अधिकार्याने थकवले आहे. गरीब असणार्या या मदतनीस व्यक्तीला कामावर येऊ नकोस असे सांगण्यात आले. यावर त्यांनी राहिलेले चार महिन्यांचे 40 हजार इतके मानधन देण्याची विनंती केली. या गरिबाचे पैसे द्यावेत यासाठी सहकारी, अधिकारी आणि जवानांनीही हे पैसे थकवणार्या अधिकार्याला सांगितले आहे.
कामावर का जात नाही? अशी सारखी विचारणा कुटुंबातून होऊ लागल्याने ही व्यक्ती रोजच्या रोज घराबाहेर पडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात येत होती. गेल्या शुक्रवारी अशाच प्रकारे येऊन कार्यालयात ते बसलेले असताना त्या अधिकार्याने व्यक्तीला मारहाण केली. हा प्रकार स्थानिक नेत्यांना कळल्यानंतर त्यांनीही या प्रकरणाचा निकाल लावण्याचे ठरवले आहे.