कळंबणी रुग्णालयातील अधिपारिचारिकांना कामथे रुग्णालयात वर्ग केल्यास जनआंदोलन
खेड : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने शासकिय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरील ताण कमालीचा वाढला आहे. शासकिय रुग्णालयातील कर्मचारीच पॉझिटिव्ह येऊ लागले असल्याने कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे. अशा परिस्थितीत कळंबणी कोव्हिड रुग्णालयातील पाच अधिपारिचारिकांना कामथे कोव्हिड रुग्णालयात वर्ग करण्याचा आदेश जिल्हा शल्य चिकित्सक यांनी काढला असल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाच्या एकंदरीत कारभाराबाबत आधीच ओरड सुरु आहे. या रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांसह काही तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने या ठिकाणी उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. कोरोनासंकटात तर रुग्णांपुढे समस्यांचा डोंगरच उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत या रुग्णालयातील पाच अधिपारिचारिकांना कामथे येथील कोव्हिड रुग्णलयात वर्ग करण्याचे आदेश जिल्हास्तरावरून देण्यात आले आहेत.
कळंबणी कोव्हिड रुग्णालयात आधीच कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यात पाच अधिपारिचारिकांना कामथे येथील कोव्हिड रुग्णालयात वर्ग केले तर कळंबणी कोव्हिड रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असल्याने रुग्णांची हेलसांड होत आहे. खेड तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कळंबणी कोव्हिड रुग्णालयातील एकाही अधिपारिचारिकेला अन्य रुग्णालयात वर्ग केले जावू नये अशी मागणी जनतेतून होत आहे. जनतेच्या भावनांचा आदर करुन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळंबणी रुग्णालयातील अधिपरिचारिकांना कामथे कोविड रुग्णालयात वर्ग करण्याचे आदेश मागे घ्यावेत अन्यथा जनआंदोलन छेडावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
www.konkantoday.com