
संभ्रम दूर करा, मगच स्मार्ट मीटर बसवा, वीज ग्राहकांची मागणी, आ. शेखर निकम यांच्या उपस्थितीत बैठक.
घर मालकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्राहकांना विश्वासात न घेता महावितरणकडून नवीन खासगी मीटर बसवले जात आहेत. या मीटरच्या माध्यमातून वीजबिलांच्या रकमेत मोठी वाढ झाली असून ठिकठिकाणी वीज मीटर बसवण्यास विरोध होवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी शुक्रवारी सायंकाळी सावर्डे येथे महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता सुनील माने, कार्यकारी अभियंता नितीन पळसुले देसाई, संतोषकुमार कॅरमकोंडा, उपकार्यकारी अभियंता अनिल खोडे, शाखा अभियंता प्रवीण राऊत, मानव संशोधन विभागाचे व्यवस्थापक अशोक काजरोळकर यांच्यासह नागरिकांच्या उपस्थितीत बैठक घेतली.या बैठकीत उपस्थितांनी स्मार्ट मीटरसह वीजपुरवठ्याच्या समस्या मांडल्या. सध्या घरमालकांना पूर्वसूचना किंवा ग्राहकांना विश्वासात न घेता खाजगी कंपनीचे कर्मचारी घराघरात जावून स्मार्ट मीटर बसवत आहेत. या मीटरच्या माध्यमातून वीजबिलांच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या संमत्तीशिवाय नवीन मीटर बसवू नयेत, मीटर वाचन नियमितपणे करून त्याची माहिती ग्राहकांना द्यावी, दिलेली विजबिले पुन्हा तपासून ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्क करून सुधारित करावीत, खाजगी कंपन्यांची नियुक्ती थांबवावी व सर्व कामे महावितरणमार्फत पारदर्शक पद्धतीने करण्यात यावीत आणि वीजमीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवावी अशी मागणी केली.www.konkantoday.com