रसाळगड रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीस बंद
खेड : गेले काही दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड-रसाळगड मार्गावर दरड कोसळली असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. झापाडी आणि निमणी या दोन गावांच्या दरम्यान ही घटना घडली असल्याने या मार्गावरील गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे.
गेले काही दिवस खेडमध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पावसामुळे भातशेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने
शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हळवी भातशेती कापणीला आली असतानाच पावसाचा हैदोस सुरु झाला असल्याने भातशेतीची पुरती वाट लागली आहे. त्यातच आज पहाटेच्या वेळी रसाळगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
खेड रसाळगड या मार्गावर झापाडी, निमणी, रसाळगड ही गावे आहेत. या गावातील ग्रामस्थांना दैनदिन व्यवहारांसाठी खेड शहरात यावे लागते. मात्र आज दरड कोसळून रस्ताच बंद झाल्याने या गावातील ग्रामस्थांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे.
रसाळगड या शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला गडकिल्ला आहे. त्यामुळे पावसाळयातही या गडावर पर्यटकांची ये-जा सुरु असते. पुर्वी या गडावर जाण्यासाठी निमणीपर्यंत वाहनाने आणि पुढे पायी जावे लागत असे मात्र आता गडाच्या पायथ्यापर्यंत रस्ता झाला असल्याने हा शिवकालीन गड पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. पावसाळ्यात गडावरून दिसणारे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी येथे अनेक पर्यटक येत असतात. मात्र आता हा रस्ताच बंद झाल्याने पर्यटकांची देखील गैरसोय झाली आहे.
रस्त्यावर आलेले दरड संबधित विभागाने तात्काळ बाजूला करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
www.konkantoday.com