कोकण सिंचनासाठी निधी मंजूर करावा या रामदास कदम यांच्या मागणीला राज्यपाल कोश्यारी यांनी सकारात्मक प्रतिसाद; शासनाकडून अहवाल मागवला
खेड : कोकणातील सिंचनासाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा या माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या मागणीला राज्यपाल कोश्यारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अप्पर मुख्य सचिव आणि नियोजन विभाग यांच्याकडून अहवाल मागवला आहे. राज्यपालांची स्वाक्षरी असलेले तसे पत्र रामदास कदम यांना प्राप्त झाले आहे.
सिंचनाच्या बाबतीत कोकणावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ११ ऑगस्ट रोजी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यपालांना कोकण विभागाच्या सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्वतंत्र ५ हजार कोटींचा निधी मंजूर उपलब्ध करून द्यावा असे निवेदन दिले होते.
स्वातंत्र्यानंतर कोकणात फक्त १.५ टक्के सिंचन झाले असून पश्चिम महाराष्ट्रात ५० टक्के सिंचन झाले आहे. कोकण सुजलाम सुफलाम करण्यासाठी कोकणातील धरणांच्या कामांसाठी निधी मिळत नाही. मात्र कोकणच्या हक्काचे असलेल्या कोयनेच्या अवजलापैकी फक्त १० टी.एम.सी. कोकणाला देऊन ५७.५ टक्के ईतरत्र घेऊन जाण्याचा घाट सुरु आहे.
कोकणावर नाणार प्रकल्प लादु नये अशी कोकणवासियांची मागणी आहे. परंतु याच नाणार प्रकल्पासाठी ७.५ टीएमसी पाण्याची तरतूद केली गेली आहे. हे सारे कोकणावर अन्यायकारक असल्याने कोकणच्या बाहेर ५० टी.एम.सी. पाणी वळविण्याचा जो प्रस्ताव आहे, तो रद्द करुन फक्त २५ टी.एम.सी. पाणी मुंबईसाठी किंवा रायगडसाठी वळविण्यात यावे. प्रथमत: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांची तहान भागवावी व नंतरच इतरत्र पाणी वळविण्याचा प्रस्ताव आणावा अशी मागणी या निवेदनात रामदास कदम यांनी केली होती.
या मागणीच्या अनुषंगाने कोश्यारी यांनी राजयाचे अपार मुख्य सचिव आणि महाराष्ट्र राज्य नियोजन विभाग यांच्याकडून अहवाल मागवला आहे. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सिंचनाच्या दृष्टीने कोकणावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्यपालांकडे केलेल्या मागणीला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने कोकण सुजलाम सुफलाम करण्याचे रामदास कदम यांचे स्वप्न साकार होणार आहे.
www.konkantoday.com