मराठा आरक्षण स्थगिती निर्णयाविरोधात रत्नागिरीत समाज बांधवांचे आंदोलन
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती आदेश दिला आहे. या विरोधात रत्नागिरीतील सकल मराठा समाज आंदोलनाच्या पवित्र्यात असून दि. १८ सप्टेंबरला जिल्हाधिकारी श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा यांना निवेदन देण्यात येणार आहे.
आरक्षणावरील स्थगितीच्या निर्णयामुळे समाजात प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला आहे. समाज बांधवांनी केलेल्या आंदोलनामुळे हक्काचे आरक्षण देण्यास शासनाला भाग पाडले होते. विद्यार्थी, युवक, बेरोजगार आदी घटकांना नोकरी, शिक्षणात आरक्षणामुळे मोठी संधी मिळू लागल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने समाजाच्या स्वप्नांवर विरजण पडले आहे. मेहनतीचे मिळविलेले यश सहजासहजी वाया जाऊ नये यासाठी समाज बांधवांनी आंदोलनाच्या हालचाली पुन्हा सुरू केल्या आहेत. हक्काच्या आरक्षणासाठी विविध स्तरावर बैठका चालू झाल्या आहेत. न्यायालयीन निर्णय, शासनाची भूमिका याबाबत समाजाने निषेध नोंदविण्यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्याची भूमिका स्विकारली आहे. जिल्हाधिकार्यांना निवेदन देवून निषेध समितीच्या धोरणानुसार आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठविण्याची मागणी समाजबांधवांनी केली आहे. जिल्हाधिकार्यांना निवेदन देताना शासनाच्या सर्व अटी, शर्तीचे पालन केले जाणार आहे. दि. १८ सप्टेंबरला समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपस्थित रहावे असे आवाहन दिनेश सावंत, सुधाकर सावंत, ऍड. अजय भोसले, संतोष तावडे, केशवराव इंदुलकर, कौस्तुभ सावंत, नंदू चव्हाण आदींनी केले आहे.
www.konkantoday.com