
अखेर आश्वासनानंतर ११ दिवसानंतर भगवान कोकरेंचे उपोषण स्थगित
_पशुसंवर्धन विभागाने दिलेले पत्र व खासदार श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले यांनी केलेली मध्यस्थी यामुळे गेल्या ११ दिवसांपासून भगवान कोकरे यांनी पुकारलेले आमरण उपोषण रविवारी स्थगित केले. खेड तालुक्यातील लोटे येथे हे उपोषण सुरू होते. दिलेल्या आश्वासनाची १५ दिवसात पुर्तता न केल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा कोकरे यांनी दिला आहे.राज्यातील गोशाळेमध्ये असलेल्या गाईला शासनाने केवळ चारा द्यावा, या प्रमुख मागणीसह लोटे गोशाळेचे रखडलेले २५ लाखांचे अनुदान शासनाने तातडीने द्यावे, वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावावा, जागेचा प्रश्न सोडवावा, या मागण्यांसाठी कोकरेंनी हे उपोषण पुकारले होते. इतके दिवस शासनाने याकडे दुर्लक्ष केले. मात्र रविवारी खेड पशुसंवर्धन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय देशमुख, धामणदेवीचे तलाठी दिलीप तांबे व पोलीस अधिकार्यांनी कोकरेंची भेट घेतली. यावेळी पशुसंवर्धन विभागाने ज्या मागण्या त्यांच्या अखत्यारित आहेत त्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच वारकरी संप्रदाय कोकण विभागाचे अध्यक्ष विश्वनाथ वारिशे, आखाडा परिषदेचे प्रल्हाद शास्त्री, अंबरनाथमधील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक शिवाजी इरमाळी यांनीही रविवारी कोकरे यांची भेट घेतली. यावेळी वारिशे यांनी आपली खासदार शिंदे व आमदार गोगावले यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी या प्रश्नात लक्ष घालून १५ दिवसात न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आम्ही कोकरे यांना उपोषण स्थगित करण्यास सांगितले असून त्याप्रमाणे ते स्थगित झाले आहे. www.konkantoday.com