कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरातून रेल्वेसंदर्भातील प्रकल्प तयार करणार्या अलिबागच्या विद्यार्थ्यांचा चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरव
(राजेश बाष्टे अलिबाग)
प्रतिकुल परिस्थितीत सामर्थ्याच्या जोरावर आकाशाला गवसणी घालता येते हे अलिबागच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. यश प्रत्येकालाच खुणावत असतं, पण खूप कमीजण त्याच्या दिशेने जाण्याची हिंमत दाखवतात, ही हिम्मत नऊ अलिबागकर तरुणांनी दाखवली, असे गौरवोद्गार पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह, नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी काढले.
कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरातून कार्य करणार्या रेल्वेसंदर्भातील प्रकल्प तयार करणार्या अलिबागच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
रेल्वे अपघातात मोठ्या प्रमाणात जीवितहानी, आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी अलिबागच्या हर्षल मंगेश जुईकर, वैष्णवी पटेल, वैभव वर्तक, कुंजल पाटील, वरद थळकर, आदेश जुवेकर, मेघना पाटील, कौशल घरत, भूमिका पाटील या विद्यार्थ्यांनी ’आर्टिफिशल इंटलेजिन्स रेल्वे प्रोजेक्ट मॉडेल’ तयार केले आहे. लोकल, मेल या मल्टिपल रेल्वेट्रॅकवर चालकरहित धावणार्या रेल्वेसाठी हे मॉडेल विकसित केले. या प्रकल्पाची दखल रेल्वे मंत्रालयानेही घेतली आहे.
हे सर्व तरुण संगणक विज्ञान आणि महिती तंत्रज्ञान शाखेचे विद्यार्थी आहेत. संगणकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकल्प तयार केले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या प्रकल्पात या नऊ विद्यार्थ्यांनी आर्टिफिशल इंटेलिजन्स रेल्वे प्रोजेक्ट मॉडेल तयार केले. यासाठी त्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पाटील, सुरेंद्र दातार, शिल्पा कवळे,सत्यजित तुळपुळे इतर प्राध्यापक आणि पालक यांचे सहकार्य मिळाल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगीतले.
आर्टिफिशल इंटेलिजन्स रेल्वे मॉडेल बनविण्यासाठी त्यांच्या टिम मेंबरने चर्चगेट येथे जाऊन मोटरमन, स्टेशन मास्टर, टीसी, रेल्वे कंट्रोल रूममध्ये जाऊन माहिती गोळा केली. त्यानंतर इटली येथून सेन्सर मागवून स्वतःचे मॉडेल तयार केले.
दरम्यान, गुगल फेलोशिप परीक्षेसाठी हर्षल जुईकर याने आपले मॉडेल पाठविले होते. तीन लाखमधून 47 हजार प्रकल्पांची गुगलने निवड केली. अंतिम फेरीत केवळ नऊ प्रकल्प निवडण्यात आले, त्यात हर्षलच्या प्रकल्पाची निवड करण्यात आली. या प्रकल्पाबाबत गुगलकडून हर्षलची तीन तास मुलाखत घेण्यात आली. गुगलकडून फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत हर्षलने देशातून दुसरा क्रमांक पटकाविला.
हर्षल व त्याच्या सहकार्यांनी मिळविलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह, शेकाप महिला आघाडी प्रमुख, नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व मानपत्र देवून सन्मान केला.
www.konkantoday.com