
रसिकांना दर्जेदार 33 पुस्तकांच्या काही भागाचं अभिवाचन,आर्ट सर्कल चा नवा उपक्रम
टाळेबंदीच्या काळातसुद्धा 2 मे पासून नवनवे उपक्रम राबवत आर्ट सर्कलने, उपक्रमांचे आणि नाविन्याचे सातत्य राखले आहे. आर्ट सर्कलचे facebook page आणि youtube चॅनेल या दोन समाजमाध्यमांद्वारे हे उपक्रम रसिकांपर्यंत पोहोचवत आहोत.
दि. 18 सप्टेंबर पासून मराठी वर्षातील अधिक मासाचा प्रारंभ होत आहे. अधिक मासामध्ये कोकणातल्या काही भागात जावयाला 30-3 चे वाण देण्याची पद्धत आहे. 30-3 अनारसे किंवा बत्तासे अशा पदार्थांचा या वाणामध्ये समावेश असतो. याच प्रथेचा धागा पकडून त्याला आधुनिक स्वरूप देणारा आर्ट सर्कल चा अभिनव उपक्रम म्हणजे 30-3 वाचन वसा! रसिकांना दर्जेदार पुस्तकांच्या अभिवाचनाचे वाण यानिमित्ताने आर्ट सर्कल तर्फे देण्यात येणार आहे.
30 नव्याने प्रकाशित झालेली नव्या लेखकांची पुस्तके आणि 3 बालसाहित्यातील पुस्तके अशा 33 पुस्तकांच्या काही भागाचं अभिवाचन या उपक्रमांतर्गत करण्यात येणार आहे. हा उपक्रम दि. 16 ऑक्टोबर पर्यंत महिनाभर दररोज चालणार असून रोज सायंकाळी 7 वाजता आर्ट सर्कल च्या fb page वरून आणि youtube चॅनेल वरून रसिकांना याचा आनंद घेता येईल. कै. अरुण काकडे, सचिन कुंडलकर, गणेश मतकरी, डॉ. आशुतोष जावडेकर, अवधूत डोंगरे, रश्मी कशेळकर, करण जोहर (अनुवाद नीता कुलकर्णी), किरण येले, प्रणव सखदेव, भूषण कोरगावकर, हृषीकेश गुप्ते, मोहना जोगळेकर, मृदुला दाढे-जोशी, नंदिनी देसाई, शरदच्चंद्र चिरमुले, प्रवीण बांदेकर, इत्यादी लेखकांच्या दर्जेदार लेखनाचा या उपक्रमांमध्ये समावेश होणार आहे. तसेच यातील अनेक लेखक अभिवाचनांनातर लगेचच रसिकांच्या थेट(live) भेटीला येणार आहेत.
पहिल्या पंधरवड्यात अक्षय वाटावे गोपाळ आणि गंधार जोशी, मयुरा जोशी, रमा सोहनी-रानडे, स्वानंद देसाई, अभिजित शेलार, हृषीकेश शिंदे, मनोज भिसे, सायली खेडेकर, दीप्ती कानविंदे, कश्ती शेख, नीता कुलकर्णी (पुणे) इत्यादी अभिवाचकांचा सहभाग आहे.
हे सर्व नाट्यक्षेत्रातील कलाकार असून या वाचनाला अभिनयाची जोड देत पुस्तक अधिक प्रभावीपणे रसिकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत. पुढच्या पंधरवड्याची कलाकार यादी आणि पुस्तक यादी देखील जाहीर करणार आहोत.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात सर्व नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा समावेश होणार आहे. जुन्या प्रथेला नवा साज देताना नवी प्रकाशित झालेलीच पुस्तकं असावीत हा यामागचा विचार. नवे संदर्भ, नवे विषय, नवी धाटणी, नवी मांडणी, नवा दृष्टिकोन हे सर्व यानिमित्ताने अनुभवता यावे याकरिता हे प्रयोजन!प्रथा परंपरा यांच्याकडे नव्या दृष्टीने पाहत त्याला नवा आयाम या उपक्रमाच्या निमित्ताने आर्ट सर्कल देत आहे.
प्रतिभावान लेखकांच्या साहित्याच्या वाचकांचा परीघ विस्तारण्याचा हा प्रयत्न म्हणजे 30-3 वाचन वसा! या उपक्रमाला देखील रसिकांनी नेहमीप्रमाणेच आवर्जून दाद द्यावी असे आवाहन आर्ट सर्कल रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com