कोव्हीडच्या प्रकोपात प्रशासनाच्या, शासनाच्या बेपर्वाईमुळे रत्नागिरी त्रस्त; जिल्हा शल्यचिकित्सकांना तात्काळ हजर करा – ॲड. दीपक पटवर्धन
रत्नागिरी जिल्ह्यात कोव्हीड १९ चा प्रकोप आहे. रुग्णसंख्या आणि हॉस्पिटल मधील बेड्स सुविधा यामध्ये तफावत आहे. हॉस्पिटल रुग्णांनी भरलेली आहेत. शासकीय रुग्णालयात आय.सी.यु. बेड उपलब्ध नव्हते अशी दोन दिवसापूर्वीची स्थिती होती. रोज वाढणाऱ्या रुग्णांना सामावून घेण्यासाठी अतिरिक्त सुसज्ज आरोग्य व्यवस्था युद्धपातळीवर उभारण्याची गरज असून तशी मागणी करूनही अद्याप जिल्ह्यात कोणतीही हालचाल होत नाही. आजपर्यंत १५० पेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत. हे कमी होत, म्हणून की काय आज जिल्हा शल्य चिकित्सकांना जिल्हाधिकारी हजर करून घ्यायला तयार नाहीत. असे वृत्त पत्रात वाचलं आणि प्रकरण शासन दरबारी गेल असेही वाचनात आले. ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे. डॉक्टरांची कमतरता असताना जिल्हा शल्यचिकित्सक दीर्घ मुदतीच्या रजेवर होते ते हजर झाले आता त्यांच्याकडे चार्ज दिला जात नाही. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना प्रकोप सुरू असताना जिल्हा शल्यचिकित्सक नाही हे दुर्दैवी आहे. प्रशासनाच्या ढिसाळ, बेजबाबदार कारभाराचा हा नमुना म्हणावा लागेल जिल्हा शल्यचिकित्सकांना का हजर करून घेतले जात नाही? याबाबत जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे. महामारी चालू असताना, डॉक्टरांची कमतरता असताना, रुग्णसंख्या वाढती असताना, जिल्हा शल्यचिकित्सकांना कार्यभार देण्यास जिल्हाधिकारी तयार नाहीत. अशा वृत्तपत्रात बातम्या झळकणे जनतेचे मनोधैर्य खच्चीकरण करणारे आहे.
एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी कार्यभार देण्यास विरोध दर्शवतात. याचे कारण गुलदस्त्यात ठेवून चालणार नाही. वस्तुस्थिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे आणि असलेल्या जिल्हा शल्यचिकित्सकांना कार्यभार द्यायचा नसेल तर नवीन शल्यचिकित्सक तात्काळ रुजू करून घेणे आवश्यक ठरते. जिल्हाधिकाऱ्यांचा विरोध म्हणून शल्य चिकित्सकांना कार्यभार महामारी सुरू असतानाही नाही ही गोष्ट शासन अस्तित्वात नसल्याचं लक्षण आहे. जिल्हा प्रशासन व्यवस्था ही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. कोणाच्या स्वीट व्हीम्स वर प्रशासन चालत नाही. जनतेला, रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा प्राप्त करून देण्याची जबाबदारी शासन, प्रशासन व्यवस्थेची आहे. हे ध्यानात घेऊन जिल्हा शल्यचिकित्सकांच्या संदर्भातील गोंधळ तात्काळ थांबवावा. मा. पालकमंत्री महोदयांनी लक्ष देऊन चाललेला गोंधळ थांबवावा व जिल्ह्याला तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सक उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी जिल्हाध्यक्ष दक्षिण जिल्हा ॲड. दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना पत्र देऊन केली आहे.
www.konkantoday.com