पोयनार धरणाचे ठप्प झालेले काम तात्काळ सुरु करण्याचे आदेश द्या – आमदार योगेश कदम यांचे जलसंपदा सचिवांना पत्र

खेड : गेली १५ वर्षे ठप्प असलेले तालुक्यातील पोयनार धरणाचे काम तात्काळ सुरु करून प्रकल्पग्रस्तांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करण्याचे आदेश तातडीने दिले जावेत अशी मागणी करणारे पत्र खेड-दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले आहे.
याबाबत माध्यमांना माहिती देताना आमदार योगेश कदम म्हणाले, खेड तालुका सुजलाम सुफलाम करण्याबरोबरच तालुक्याला भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मार्ग निघावा यासाठी रामदास कदम यांनी या तालुक्यामध्ये धरण प्रकल्प मंजूर करून घेतले, पोयनार हे धरण देखील त्या पैकीच एक आहे. या धरणाचे काम पंधरा वर्षांपुर्वी सुरु झाले. मात्र सद्यस्थितीत हे काम पुर्णपणे ठप्प आहे. धरणाचे काम पुर्णत्वास न गेल्याने ज्या उद्देशाने प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले होते तो उद्देश अद्याप सफल झालेला नाही.
या धरणाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला २०११ साली मंजूरी मिळाली. त्यानंतर या कामाला गती यायला हवी होती मात्र दुर्दैवाने धरणाचे काम पुढे सरकलेच नाही. आतापर्यंत या धरणावर सुमारे ७० कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असून मागील १० वर्षापासून सुधारित मान्यता मिळालेली दिली गेलेली नाही.
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे घोंगडे देखील तसेच भिजत पडले आहे. आधी पुनर्वसन आणि नंतर धरण हे सरकासचे धोरण आहे. मात्र पोयनार प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप पूर्ण झालेले नाही. गेल्या काही वर्षात पुनर्वसनाचे जे काम झाले ते अतिशय निष्कृष्ठ दर्जाचे झालेले आहे. त्यामुळे पुनर्वसनाची कामे पुन्हा करण्याची आवश्यकता आहे. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गेल्या तीन वर्षात दापोली मतदार संघातील १४ लघुपाटबंधाऱ्यांसाठी ९६ कोटीचा निधी मंजूर करवून घेतला मात्र तो निधी खर्च पडू शकलेला नाही.
धरणाखाली हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आणण्याबरोबरच तालुक्याला भेडसावणारी पाणी टंचाई कायमस्वरुपी संपुष्टात आणण्यासाठी धरणाचे ठप्प झालेले काम तातडीने सुरु होणे गरजेचे आहे . त्यामुळे पोयनार लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम तात्काळ सुरु करण्याबाबतचे आदेश द्यावेत अशी मागणी जलसंपदा विभागाच्या सचिवांकडे करण्यात आली असल्याचे आमदार योगेश कदम यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button