
यंदा गणेशोत्सवामघ्ये जाखडीचे सुर घुमण्याची शक्यता धुसर झाली
खेड : श्रावण महिना सुरु झाला की कोकणात जाखडीच्या तालमीना सुरवात होते. ग्रामीण भागात रात्री उशीरार्यंत ढोळकी आणि झांजाचा आवाज घुमू लागतो. गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा जाखडीच्या तालमी बंद असल्याने यंदा गणेशोत्सवामघ्ये जाखडीचे सुर घुमण्याची शक्यता धुसर झाली आहे.
जाखडी ही कोकणातील अतिशय महत्वाची लोककला आहे. गणेशोत्सवादरम्यान या लोककलेला
एक वेगळेच महत्व प्राप्त होते. शक्ति आणि तूरा या दोन रुपामध्ये ही लोककला पहावयास मिळते. शक्ती म्हणजे नार आनि तुरा म्हणजे नर असा या जाखडी लोककलेचा अर्थ सांगितला जातो. गणेशोत्सवाच्या महिनाभर आधी म्हणजे श्रावण मास सुरु झाला की जाखडीच्या तालमींना सुरवात होते. गावातील समाजमंदीर, देऊळ या ठिकाणी जाखडी नृत्यकलाकार एकत्र येऊन गणा धावरे, गणा पावरे करत जाखडीच्या तालमीला सुरवात करतात. गणेशोत्सवादरप्यान शक्ती आणि तुरा असे जाखडीचे जंगी सामने होतात. गण, गौळण पद, अशी प्रबोधनपर गीते सादर करून जाखडी नृत्य कलाकार कलारसिकांची मने रिझवतात.
पुर्वी फक्त पुरुषांची मक्तेदारी असलेल्या शक्ती-तुरा जाखडीच्या सामन्यात आता महिला देखील सहभागी होवू लागल्या आहेत. त्यामुळे जाखडीच्या सामन्यांना प्रेक्षकांची गर्दीही वाढू लागली आहे. मात्र यावर्षी सारं काही सुनं सुनं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाखडी कलाकारांना एकत्र येणे शक्य नसल्याने जाखडी चे सुर घुमेनासे झाले आहेत. त्यामुळे या काळात ग्रामीण भागात गज़बजलेल्या रात्री शांत झाल्या आहेत.
www.konkantoday.com