बुटाला फाऊंडेशनकडून कळंबणी ग्रामीण रुग्णालयाला ३० ऑक्सिजन बेड्स
खेड : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून येथील एच पी बुटाला फाऊंडेशनच्या वर्तीने कळंबणी कोव्हिड रुग्णालयाला ३० ऑक्सिजन बेड आणि आयसीयु रुग्णवाहिका देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना बुटाला फाऊंडेशनने घेतलेला हा निर्णय कोरोना रुग्णांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा ठरणार आहे.
गेल्या काही दिवसात खेड तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. सुरवातीला शहर व आजुबाजुच्या परिसरात आढळून येणारे कोरोना रुग्ण आता तालुक्याच्या अतिदुर्गम ग्रामीण भागातही आढळून येऊ लागले आहेत. त्यातच आता गणेशोत्सवासाठी तालुक्यात चाकरमानी येणार असल्याने तालुक्यात कोरोनाबाधीतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारत येत नाही.
उत्तर रत्नागिरीत कोरोनाबाधीतांची संख्या वाढू लागल्यानंतर खेड येथील कळबंणी उपजिल्हा रुग्णालयाला कोव्हिड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर या ठिकाणी कोरोनावाधीतांवर उपचार करण्यास सुरवात करण्यात आली. मात्र या ठिकाणी असलेल्या बेड्सची संख्या मर्यादीत असल्याने रुग्णांवर उपचार करताना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर येथील एच पी बुटाला फाऊंडेशनचे अध्यक्ष कीस्तुभ बुटाला यांनी या रुग्णालयासाठी ३० ऑक्सिजन बेड्स आणि आयसीयु रुग्णवाहिका देण्याची घोषणा केल्याने ही घोषणा कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे.
फाऊंडेशनच्या वतीने घरडा को्हिड केअर सेंटर येथे असलेल्या रुग्णांसाठी दरदिवशी फळांचे वाटप केले जाणार आहे. शिवाय खेड तालुक्यासाठी एका शिबीराचे आयोजन करून त्यामध्ये १ हजार रुग्णांचे स्क्रिनिंग केले जाणार आहे. गेले काही महिने तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातारवरण आहे. याच दरम्यान सामाजिक बांधिलकी जपत एच पी. बुटाला फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने हाती घेतलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
www.konkantoday.com