
आमदार नाराज असल्याचे सांगण्यामागे नगराध्यक्षांचा नेमका हेतू काय – केदार साठे
दापोलीः- (वार्ताहर)दापोलीतील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून हाय रिस्कमध्ये काम करीत असूनही नगराध्यक्षांनी आयोजित बैठकीला ते गेले नाहीत. त्यामुळे आमदार योगेश कदम नाराज झाले असे पत्र नगराध्यक्षा परवीन शेख यांनी वैद्यकीय व्यावसायिकांना पाठविले आहे. आ.कदम यांना बरे वाटावे यासाठी नगराध्यक्षांनी बैठक आयोजित केली का असा सवाल भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. केदार साठे यांनी पत्रकार परिषदेत केला.
श्री.साठे म्हणाले की, डॉक्टर असोसिएशन अशी कोणतीही संस्थाच दापोलीत नाही. या बैठकीला नगराध्यक्षांनी दापोलीचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलिस निरीक्षक यांनाही बोलावले होते. मात्र कोणी अधिकारीही या बैठकीला उपस्थित नव्हते. 2 ऑगस्टला सकाळी 9 वा. नगरपंचायत कार्यालयात ही बैठक आयोजित केली होती. त्यामुळे हे वैद्यकीय व्यावसायिक सकाळी रूग्ण तपासतील का, या बैठकीला जातील? कोव्हिड 19 संदर्भातील उपाययोजनांसंदर्भात अशी बैठक बोलावण्याचा अधिकारच नगराध्यक्षांना नाही. या बैठकीला उपस्थित वैद्यकीय व्यावसायिकाने अशा बैठका ऑनलाईन घ्याव्यात, असे नगराध्यक्षांना सांगितले. बैठकीला आ.कदम आले होते. ते नाराज झाले, मात्र नगराध्यक्षांनी डॉक्टरांना 4 ऑगस्टला पाठविले. ही गर्भित धमकी समजावी का असे धमकीवजा पत्र पाठवून डॉक्टरांचे मनोधैर्य खच्चीकरणाचा प्रयत्न केला जात आहे. नगराध्यक्ष शेख यांनी 2 ऑगस्ट रोजी बोलाविलेल्या बैठकीत विषय वेगळा तर 4 ऑगस्टला पाठविलेल्या पत्रात बायोमेडिकल वेस्टवर चर्चा करायची होती, असा मुद्दा मांडला आहे. हा विरोधाभास कशासाठी? डॉक्टरांना त्यांचे काम करू द्या. राजकारणात त्या देवदूतांना कशासाठी ओढताय? असा सवालही साठे यांनी केला. नगराध्यक्षांच्या सहीच्या पत्राचा बोलविता धनी वेगळाच असल्याचा संशय साठे यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com