
मुंबईतून कोकणात येणार्या चाकरमान्यांना कडक नियम तर परराज्यातील मुंबईत येणार्या लोकांना मात्र नियमात सूट
कोकणात गणेशोत्सवासाठी येणार्या चाकरमान्यांसाठी शासनाने अनेक नियम व अटी घातल्या असून त्यामध्ये येणार्या चाकरमान्यांच्या तपासणीपासून एसटी व अन्य गाड्यांमध्ये सुरक्षित अंतर आदींचा समावेश आहे. याशिवाय येणार्या चाकरमान्यांना काही दिवस क्वारंटाईनही करण्यात येणार आहे. आपल्याच राज्यातून कोकणात येणार्या चाकरमान्यांना राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली जाहीर केली आहे. गणेशोत्सवात देखील आरतीपासून मिरवणुकीमध्येही सहभागाबाबत नियमावली केली आहे. मात्र एकीकडे असे असतानाच मुंबईत परराज्यातून अनेक कामगार ट्रेनने परतत आहेत. दादर स्थानकात अनेक परराज्यातून ट्रेन येत असून आलेल्या ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले गेलेले दिसत नव्हते. कारण डब्यात प्रवाशांची गर्दी होती. हे प्रवासी गाडीतून उतरून सरळ बाहेर येत होते. त्यामुळे यांना चाकरमान्यांसाठी असलेले क्वारंटाईन व अन्य नियम नाहीत का? असा सवाल याठिकाणी दादर स्टेशनवर उपस्थित असलेल्या चाकरमान्यांना पडला आहे. कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर सगळ्यांना सारखे नियम ठेवून तशी दक्षता घेणे आवश्यक आहे. मात्र येथे हे होताना दिसत नसल्याने चाकरमान्यांच्यात नाराजी आहे.
www.konkantoday.com