अंतिम वर्षांच्या परीक्षाआज सुनावणी, निर्णयाकडे संपूर्ण शिक्षणक्षेत्राचे लक्ष लागले
अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची राज्य सरकारांची भूमिका देशातील उच्च शिक्षणाच्या दर्जाला घातक असून, परीक्षेचा आमचा निर्णय धोरणात्मक असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रतिज्ञापत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. दुसरीकडे, परीक्षांविना इंटर्नशीप सुरू करण्यास केंद्रीय वैद्यकीय परिषदेने नकार दिला आहे. या दोन्ही प्रकरणांवर आज सुनावणी असून, निर्णयाकडे संपूर्ण शिक्षणक्षेत्राचे लक्ष लागले आहे.विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या आयोगाच्या निर्णयाला युवा सेनेसह काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेताना न्यायालयाने आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयोगाने आपली भूमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र गुरुवारी न्यायालयात दाखल केले. विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्यायलाच हव्यात, अशी ठाम भूमिका मांडताना त्याची कारणेही स्पष्ट करण्यात आली आहेत.
www.konkantoday.com