गणेशभक्तांना यावेळी मूर्तीशाळेत वारंवार प्रवेशाला प्रतिबंध होणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता गणेशोत्सव जवळ येत चालला असून शासनाने गणेशोत्सवाबाबत नियम करून दिले आहेत. शिवाय गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. गणपतीत गणेश मूर्तींच्या उंचीपासून पुढील कार्यक्रमापर्यंत नियम ठरविण्यात आले असून त्याचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचा परिणाम गणेश चित्रशाळेवर झाला असून त्यांनीही आता नियमावली केली आहे. गणपती उत्सव हा कोकणी माणसाचा मोठा उत्सव. त्यामुळे मूर्तीसाठी पाट दिल्यापासून मूर्ती होईपर्यंत तो वारंवार आपल्या मूर्तीच्या पाहणीसाठी चित्रशाळेत भेट देत असतो. मात्र यावेळी त्याला मर्यादा पडल्या आहेत. चित्रशाळेने देखील नियमावली केली असून त्यामध्ये मास्कशिवाय प्रवेश न देण्याचा व एका व्यक्तीने आत येण्याचा योग्य अंतर राखण्याचे आणि महत्वाचे म्हणजे गणपतीचा पाट दिल्यानंतर गणपती किती झाला आहे हे पाहण्यासाठी गणेशभक्तांनी वारंवार येवू नये असे सूचनाफलकच विविध गणेशमूर्ती शाळेत लावण्यात आले आहेत. एकूणच आता गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमाच्या बंधनात अडकणार आहे.
www.konkantoday.com