रत्नागिरीतील चंपक मैदानाजवळ व्हेल माशाची सुमारे 6 कोटी रुपयांची उलटी जप्त; तस्करी टोळीतील दोघांना अटक

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय बाजारात महाग किमतीने विकल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीतील दोघांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बाजारभावाप्रमाणे सुमारे ६ कोटी रुपये किमतीची सुमारे पावणेसहा किलो वजनाची उलटी शहरानजीकच्या उद्यमनगर चंपक मैदानाजवळ जप्त करण्यात आली आहे. महम्मद जाहीर सय्यद महम्मद अत्तार (वय ५६, रा. सध्या राजापूरकर काॅलनी, उद्यमनगर, मूळ लखनौ), हमीब सोलकर (रा. लाला काॅम्प्लेक्स, रत्नागिरी) अशी अटक केलेल्‍या दोघा संशयित आरोपींची नावे आहेत.
सोमवारी सायंकाळी उद्यमनगरनजिकच्या चंपक मैदानाजवळ दोघेजण व्हेल माशाची उलटी घेऊन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबर्‍याकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली  होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चंपक मैदानाशेजारी सापळा लावला. सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून दोनजण घटनास्थळी आले. काही वेळ ते कोणाची तरी वाट पाहात थांबले होते. याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु केली. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीच्या डिक्कीत सुमारे पावणेसहा किलो वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीचे सफेत रंगाचे तुकडे आढळून आले. त्यानंतर त्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलिसांनी महम्मद जाहीर सय्यद महम्मद अत्तार (वय ५६, रा. सध्या राजापूरकर काॅलनी, उद्यमनगर, मूळ लखनौ), हमीब सोलकर (रा. लाला काॅम्प्लेक्स, रत्नागिरी) या दोघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

**यासाठी वापरतात व्हेल माशाची उलटी*
व्हेलमाशाची उलटी म्हणजेच अ‍ॅम्बरगिस हे हलक्या राखाडी किंवा काळ्या रंगाची असते. तो मेणासारखा एक दगडसदृश पदार्थ असतो. व्हेल माशाने तो तोंडातून बाहेर फेकला की तो वाहत किनाऱ्यावर येतो. सुगंधी द्रव्ये, सुगंधी अत्तर, बॉडी स्प्रे, परफ्युम आणि अनेक औषधे तयार करण्यासाठी ते वापरले जाते. अ‍ॅम्बरगिस हे व्हेल माशाच्या शरीरात तयार होत असून देवमाशाने तोंडावाटे ही उलटी बाहेर फेकल्यानंतर बहुतांशवेळा ती समुद्र किनारी सापडते. ही उलटी किमती असल्याने तिची तस्करी केली जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button