
चतुरंग ‘मुक्तसंध्ये’त उच्चाधिकारी गर्ग-जाखड पती-पत्नींची मुलाखत
एकाच घरातल्या तरुण, तडफदार प्रशासकीय अधिकारी पती-पत्नींनी, एकाच जिल्ह्यात उच्चपदी काम करून, साधलेल्या आदर्श, अनुकरणीय, यशस्वी कारकीर्दीचा लेखाजोखा अनुभवण्याची संधी चाहत्यांना व सुजाण नागरिकांना मिळावी या हेतूने ‘चतुरंग प्रतिष्ठान’ने एका कुतूहलजन्य, औत्सुक्यपूर्ण मुलाखतीचे आयोजन केले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौ. इंदुराणी जाखड- गर्ग(IAS) व जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग(IPS) या उभयतांची मुलाखत येत्या शनिवारी दि.२६ मार्च २०२२ रोजी रत्नागिरीत चतुरंगच्या ‘मुक्तसंध्या’ या उपक्रमात घेतली जाणार आहे.
समाजातील कर्तृत्ववान् व्यक्तींचा, कलावंतांचा, मान्यवर मातब्बरांचा, त्यांच्या चाहत्यांना, सुजाण-सजग नागरिकांना जवळून परिचय व्हावा.. त्यांच्यात एक सहज सहवास-संवाद घडून यावा या हेतूने ‘मुक्तसंध्या’ या उपक्रमामधून चतुरंग प्रतिष्ठान नेहमी अशा कार्यक्रमांचे आयोजन करीत असते.
आपल्या आसपास, आपल्या समाज जीवनासाठी मातब्बरीने आणि स्वकर्तृत्वाने लक्षणीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांबद्दल, कर्तृत्ववानांबद्दल समाजातील नागरिकांना नेहमीच एक आदर वाटत असतो. त्यांच्या जीवनशैली विषयी, वाटचालीविषयी एक अनामिक कुतूहल मनात दाटलेले असते. कधी ना कधी तरी त्यांची आमने-सामने गांठ पडावी, त्यांच्यसोबत सहवास-संवादाची संधी मिळावी अशी एक सुप्त इच्छा सामान्यजनांच्या मनात वसत असतेच ! या साऱ्याला वाट मिळावी यासाठीच अशा कलासंध्यांचे चतुरंगी आयोजन होत असते.
या साऱ्या अपेक्षा ज्यांच्या बाबतीत संभवतात, हे सारे निकष ज्यांना यथोचितपणे लागू होतात अशाच डॉ.गर्ग-डॉ.जाखड या उच्चपदस्थ पती-पत्नींची, रत्नागिरीमधील दोन भिन्न क्षेत्रातील उच्चाधिकारी असणाऱ्या या दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुलाखत सर्व रत्नागिरीकर रसिकांना अनुभवता येणार आहे.
शनिवार दि. २६ मार्च २०२२ रोजी ‘जिल्हा नगर वाचनालय- रत्नागिरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने, नगर वाचनालयाच्याच सभागृहात सायंकाळी ६ वाजता सदर मुलाखत होणार आहे. ख्यातनाम् लेखिका, वक्त्या, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बहुआयामी प्राध्यापिका डॉ.सौ. निधी पटवर्धन या ही मुलाखत घेणार आहेत. या कुतूहलजन्य आणि औत्सुक्यपूर्ण मुलाखतीसाठी सर्व उत्सुक, सजग, रत्नागिरीकर नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन चतुरंग आणि नगर वाचनालय यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.