
राज्य पातळीवर व प्रशासकीय पातळीवर गणेशोत्सवाबाबत ठाेस निर्णय जाहीर होत नसल्याने संभ्रमावस्था वाढली
आगामी ऑगस्ट महिन्यात येणार्या गणेशोत्सवाबाबत राज्य पातळीवरून नियमावली आली असली तरी प्रत्यक्षात कोकणात येणार्या चाकरमान्यांबाबत वाहतुकीच्या प्रश्नाबाबत तसेच त्यांना करण्यात येणार्या क्वॉरंटाईनच्या कालावधीबाबत राज्य शासन अथवा जिल्हा प्रशासन यानी अद्यापही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली नियमावली ठरविण्यासाठी कमिटी स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामध्ये घेतलेले निर्णय वरिष्ठ पातळीवर मंजुरीसाठी पाठविण्यात येणार होते. मात्र अद्यापही त्याबाबत कोणतेही निर्णय जाहीर झाले नसल्याने दोन्ही जिल्ह्यातील ग्रामपंचायती वैयक्तिक पातळीवर चाकरमान्यांच्या क्वॉरंटाईनबाबत आपापले निर्णय जाहीर करत असल्याने चाकरमान्यांच्यात संभ्रमाचे वातावरण वाढत आहे.
चाकरमान्यांच्या सात दिवसांच्या क्वॉरंटाईनला सिंधुदुर्गात सरपंच संघटनेने विरोध केला होता. चाकरमान्यांना आणण्यासाठी परिवहन मंत्र्यांकडून एसटीची सुविधा उपलब्ध होईल असे सांगण्यात येत असले तरी याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असेही सांगण्यात येत आहे. कोकणात येणारा चाकरमानी हा आधीपासूनच आपल्या येण्याबाबत नियोजन करीत असतो. यावेळी कोकण रेल्वे सुरू होण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने कोकणात कसे यायचे याबाबत चाकरमान्यांचा संभ्रम वाढत असून त्यांची ही संभ्रमावस्था शासनाने तात्काळ निर्णय घेवून संपवावी अशी मागणी आता पुढे येत आहे.
www.konkantoday.com