लोकनेते राजाभाऊ लिमये ८५ वा वाढदिवस अभिष्टचिंतन!

0
1242

कोकणातील जनसामान्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारे लोकनेते वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये आज दि. २१ जुलै रोजी ८५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, केंद्रीय नारळ विकास बोर्डाचे उपाध्यक्ष, आर. बी. बेलोसे शिक्षण संस्था दापोलीचे अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागाचे आधारस्तंभ, सत्यशोधक साप्ताहिकाचे संपादक, मुद्रक म्हणून अर्धशतकी यशस्वी नेतृत्व करणारे कोकणातील ज्येष्ठ पत्रकार ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार शरदरावजी पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या राजाभाऊ लिमये यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन!
आज राजाभाऊ लिमये वयोमानानुसार या सर्व क्षेत्रातून निवृत्त झाले असले तरी कोकणचा औद्योगिक विकास व्हावा, नाणारसारखा रिफायनरी प्रकल्प या जिल्ह्यात उभा राहून कोकणच्या औद्योगिक विकासात क्रांती घडावी यासाठी ते सातत्याने आशावादी आहेत. रत्नागिरीत फिनोलेक्स प्रकल्पाला होणारा विरोध लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री ना.शरदचंद्रजी पवार यांनी राजाभाऊंना या प्रकल्पाच्या उभारणीत सहकार्याची सूचना केली होती. त्यावेळी राजाभाऊंनी स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन समजुतीच्या गोष्टी पटवून दिल्या. स्थानिकांनी त्यांच्या शब्दाला मान देऊन जमिनी दिल्या. फिनोलेक्स प्रकल्प संघर्ष समितीचा प्रदूषणाच्या नावाखाली झालेला किरोध संपून प्रकल्प उभा राहिला. या प्रकल्पापाठोपाठ रत्नागिरीत फिनोलेक्स इंजिनियरींग कॉलेज, इंग्रजी माध्यमाची शाळा, केटरिंग कॉलेज अशा अनेक शैक्षणिक सुविधा फिनोलेक्स उद्योग समुहाने निर्माण केल्या. त्यातून स्थानिक भूमिपुत्रांच्या मुलांना उच्चशिक्षणाच्या संधीबरोबर उच्च दर्जाच्या नोकर्‍या, कुशल-अकुशल रोजगाराच्या संधी मिळाल्या. गोळप-पावस दशक्रोशीत कंपनीने रस्ते, साकव, पाटबंधारे प्रकल्प, नळपाणी योजना आदी सुविधा गावकर्‍यांना सामाजिक बांधिलकीतून निर्माण करून दिल्या. आज या भागातच नव्हे तर संप्ाूर्ण जिल्ह्यात औद्योगिक विकासाचे काम गतिमान होत आहे. राजाभाऊंच्या या प्रयत्नांसाठी कंपनी व्यवस्थापनाबरोबरच स्थानिक भूमीपुत्रही कृतज्ञता व्यक्त करीत आहेत.
राष्ट्रवादीचे नेते मा.शरदरावजी पवार कोकणात येणार्‍या प्रत्येक प्रकल्पाला राजकीय स्वार्थापोटी संघर्ष समिती स्थापन करून होणारा विरोध पाहून कोकणात उद्योग प्रकल्प आणायला अक्कल लागते पण घालवायला ती लागत नाही असे वैषम्याने म्हणत असताना फिनोलेक्स, जिंदल प्रकल्पांचे स्मरण करून देत असतात. ना.शरदरावजी पवार सध्याच्या महाविकास आघाडीच्या सत्तेचे मार्गदर्शक म्हणून मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना नेत्यांना चार समजुतीच्या गोष्टी सांगतील आणि कोकणात नाणार रिफायनरीसारखे प्रचंड रोजगार निर्मिती करणारे औद्योगिक प्रकल्प साकार होतील असा विश्वास कोकणचे नेते राजाभाऊ लिमये अजुनही बाळगून आहेत. हा विश्वास सार्थकी लागून कोकणात आणि रत्नागिरी जिल्ह्यात तथाकथित संघर्ष समिती आणि त्यांच्या नेत्यांना परमेश्वर विकासाची बुद्धी देवो अशी भावना राजाभाऊ लिमये यांनी त्यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केली आहे. राजाभाऊंना परमेश्वराने हा विकास पाहण्यासाठी  चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य द्यावे हीच परमेश्वराकडे प्रार्थना!

प्रभाकर कासेकर,निवृत्त माहिती अधिकारी, रत्नागिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here