
सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमला श्री देव मार्लेश्वरचा विवाहसोहळा
देवरूख : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या स्वयंभू श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरिजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) रविवारी दुपारी 1 वाजून 5 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर झाला. यावेळी सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये सनई चौघड्यांचे मंजूळ सूर घुमले, तर विवाह सोहळा संपन्न होताच उपस्थित लाखो भाविकांनी ‘हर हर महादेव… हर हर मार्लेश्वर’ शिवहराचा जयघोष करीत सह्याद्री पर्वतरांगा दणाणून सोडल्या.
वार्षिक यात्रोत्सव यावर्षी दि. 12 ते 18 जानेवारी या कालावधीत साजरा होत आहे. मकरसंक्रांत दिनी विवाहसोहळा हिंदू लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार झाला. या विवाह सोहळ्याची जोरदार तयारी दोन दिवस अगोदरपासूनच मार्लेश्वर नगरीत सुरू होती.
मार्लेश्वराची पालखी, गिरिजादेवीची पालखी व यजमान व्याडेश्वराची पालखी या तिन्ही पालख्यांचे रविवारी सकाळी मार्लेश्वर तीर्थक्षेत्री वऱ्हाडी मंडळीसह आगमन झाल्यानंतर मुलगी पाहणे, मुलाचे घर पाहणे, मागणी टाकणे, पसंती करणे, मानपान आदी विवाह सोहळ्यापूर्वीचे परंपरेप्रमाणे सर्व विधी पार पडले. 360 मानकरी यांना अगत्यपूर्वक निमंत्रण देण्यात आले. मार्लेश्वर व गिरिजादेवीच्या विवाह सोहळ्याला प्रत्यक्षात सुरुवात झाल्यानंतर परंपरेप्रमाणे आंगवलीचे अणेराव मार्लेश्वरचा टोप मांडीवर घेऊन तर लांजेकर स्वामी गिरिजादेवीचा टोप मांडीवर घेऊन बसले. यावेळी लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करून मंगलाष्टकांनी विवाह सोहळा दुपारी 1 वाजून 5 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर रायपाटणकर स्वामी, म्हासोळकर स्वामी आणि लांजेकर स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी राज्यातील कानाकोपर्यातून आलेल्या लाखो भाविकांनी आपल्या डोळ्यात हा परमेश्वराचा अभूतपूर्व विवाह सोहळा साठवून ठेवला.