गवत मारण्याचे औषध फवारणी हात पंपातून तोंडावर उडून तरुणीचा मृत्यू
गवत मारण्याचे औषध फवारणी हात पंपातून तोंडावर उडून गंभीर झालेल्या एका १९ वर्षीय तरुणीचे अधिक उपचारासाठी कणकवली सिंधुदुर्ग येथे नेत असता वाटेत रुग्णवाहिकेेतच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गोळवशी धामणवाडी येथील पल्लवी जनार्दन खानविलकर (१९ वर्षे) ही शनिवार दि.२० जून रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास तिच्या राहत्या घराजवळ गवत मारण्याचे औषध फवारणी हातपंपात भरून गवतावर फवारणी करण्यासाठी पंपाला हवा मारीत असताना तिच्या हातातून पंप सरकला. यावेळी पंपातील औषध तिच्या तोंडावर उडून नाका – तोंडाद्वारे पोटात गेले.त्यामुळे तिची प्रकृती बिघडल्याने तिला प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी तिला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेले पाच दिवस याठिकाणी तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात बेड शिल्लक नसल्याने पल्लवी खानविलकर हिला गुरुवार दि.२५ जून रोजी पुढील उपचारासाठी कणकवली सिंधुदुर्ग येथे रुग्णवाहिकेतून हलविण्यात येत होते. मात्र रत्नागिरी – कणकवली प्रवासादरम्यान दुपारी १२ वाजता लांजा तालुक्यातील वाकेड घाटीत रुग्णवाहिका आली असता पल्लवी हीचा मृत्यू झाला
www.konkantoday.com