अभिनेत्री ते शेतकरी…संपदा जोगळेकर-कुळकर्णी

0
1503

आनंदाचे शेत

गेली २८-३० वर्ष लेखन, नृत्य, निवेदन, सूत्रसंचालन, नाट्य दिग्दर्शन या आनंददायी मुशाफिरीनंतर आता मनावर घेतली आहे ‘शेती’. मी आणि राहुल, आम्ही दोघांनी मिळून घेतलेला हा आयुष्याच्या पुढच्या टप्प्यातला निर्णय. वयाच्या चाळीशीनंतर काहीतरी नवीन करायचं असं आम्ही दोघांनी ठरवलं होतं. तो सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचा पदवीधर, जाहिरात क्षेत्रातल्या अतिशय मान्यताप्राप्त मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर, तर मी माझ्या क्षेत्रात स्वत:चं स्थान पक्क केलेली. काहीतरी वेगळं या यादीत खूप गोष्टी मनात आल्या. पण आम्ही स्थिर झालो ते रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर इथल्या फुणगुस गावात शेतीत रमण्यावर.शहरातलं आयुष्य जगल्यानंतर गावाकडे वळलो.

संपूर्णत: ओसाड जमिनीत विहिरीचा पॉइंट काढण्यापासून सुरवात झाली. पैसे मिळवणं हा एकमेव उद्देश न ठेवता शांत, समाधानी, निसर्गाची हानी न करता निसर्गातच कसं राहता येईल या विचारानं पुढे गेलो. स्वत:च्या जमा होत जाणाऱ्या पुंजीवर घर बांधलं. ओटी, पडवी, मंडप आणि पूर्वी ज्याला शेजघर, माजघर असं संबोधलं जायचं, त्याचं पर्यटकांना राहता येईल अशा खोल्यांत रुपांतर केलं. पहिल्यांदा ‘कृषी’ला सुरुवात केली. तांदूळ, नाचणी, पावटा, कुळिथ, तीळ, हळद याची शेती. तसंच आंबा, काजूची लागवड केली. गेल्या १२ वर्षापासून शेती आणि गेली ६ वर्ष ‘होम स्टे’ सुरू आहे.

शेतीचं अजिबात ज्ञान नसणाऱ्या राहुलनं शेतीविषयक पुस्तकं, नियतकालिकं, इंटरनेट माहिती, कृषितज्ज्ञांचं मार्गदर्शन, ‘फुकूओका’ या जपानी महान तत्ववेत्याचं ज्ञानभांडार यावर स्वत:ला जागरुक केलं.

आम्हा दोघांत योग्य ती चर्चा होत होती. यासाठी फुणगुस जवळपासच्या मंडळींना रूजू करून घेऊन त्यांचंही अनुभवज्ञान, सहकार्य मिळवत हा ‘शेतीयज्ञ’ सुरू झाला. यात सुरवातीची ५/६ वर्ष राहुलनं अपार मेहनत घेतली. गावात जम बसेपर्यंत सोमवार ते शुक्रवार मुंबईतलं ऑफिस, शनिवार-रविवार कोकण गाठायचा. नंतर मात्र पूर्णपणे नोकरी सोडून शेतीत आला. आता आम्ही दोघंही पूर्णपणे कोकणवासी झालो आहोत.

निवडक कार्यक्रमांसाठी, शूटिंगसाठी मुबईत-ठाण्यात ये-जा करते एवढंच.पूर्णपणे सेंद्रीय शेती शेणखत, पंचगव्य, पालापाचोळ्यापासून निर्माण झालेली मृदा याच्या मदतीनं करणे, कोणतंही रासायनिक खत, द्रव्य न वापरता निसर्गाशी प्रामाणिक राहून शेती करणं हा निर्धार आम्ही केला आहे.

शेतातली काम वर्षभर न थांबणारी. ऋतूप्रमाणे कामाची विभागणी. त्यातून शहरातून आलेलं हे शरीर लाडाकोडात वाढलेलं. ते आता मातीत हात घालणार,उन्हात, वाऱ्यात, पावसात काम करणार म्हटल्यावर सुरुवातीला या शरीराची थोडी नाटकं झाली.

परंतु नंतर सरावलं या वातावरणाला. स्वतःला आपण किती अळुमाळु जपलेलं असतं. पण कष्ट करून घाम आल्यानंतरची भाकरी काय वेगळीच असते. अर्थात शहरात काम करणारा माणूससुद्धा कष्ट करत असतो. परंतु बुद्धीचं काम अधिक असणाऱ्यांमध्ये एकदा शरीराला मोड घालणं म्हणजे काय हे कळायला लागलं की आणखीन आनंद वाढतो.

पावसाळ्यात जमिनीचा छान चिखल झाला, की पेरणी करणं मग लावणी करणं, शेतातली हळदीचे आंबे काढणं, आंब्याच्या पेट्या भरून ऑर्डरप्रमाणे पाठवून त्याचं व्यवस्थापन बघणं, भाज्यांची योग्य विभागणी करून त्याची योग्य प्रमाणात साठवणूक करून काही साठवणीचे पदार्थ करणं सुरू असतं. उन्हात सांडगी मिरची घालणं, चिकवड्या करणं, पापड लाटणं, वेगवेगळ्या प्रकारची लोणची चालतं. हे सर्व करत असताना माझा दिवस कसा जातो हे कळत नाही. अर्थात हे सगळे एका दिवशी नसतं. ऋतूप्रमाणे याची विभागणी असते. यात चुकलेलं वासरू, म्हैस, गाय, शोधणंही आलंच. संध्याकाळपर्यंत परतलं नाही तर रुखरुख लगणंही आलं. शेण काढणं, शेणानं सारवणं, शेणाचं खत करणं हे शिकले.

आजच्या तंत्रनिर्भर जगात सर्व यंत्र, गॅजेट्स यांची आम्हाला अद्ययावत माहिती असते. पण ताटात येणाऱ्या अन्नाविषयी मात्र आपण कमी जागरुक असतो. हे चित्र पालटण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. आता १४ गुरं, १२ सहकारी (जे तिथलेच रहिवासी आहेत), शेती आणि आम्ही असं मोठ्ठं कुटुंब आहे. अभिनेत्री ते शेतकरीण हा प्रवास मला अजिबात कठीण नाही गेला.

रूपेरी जगात वावरताना त्यातल्या चकचकीतपणापासून मी मुळातच लांब होते. मातीचा स्पर्श वास्तवात जगायला शिकवत राहतो हे या प्रवासात शिकले. पैसे मोजल्यावर माणसं मिळतात हा शहरी ठोकताळा गावानं पूर्ण बदलवला. माणसं प्रेमाने जोडूनच कमवावी लागतात हे पटवलं. पेरावं तेच उगवतं हा साधा नियम बी-बियाण्यात राहून मनावर ठसला. माझं लेखन,वाचन या प्रवासात माझ्या साथीला आहेच. कोणत्याही रॅटरेसमध्ये आता धावायचं नाहीय. सुखी आणि समाधानी तत्वाचं आदानप्रदान करत राहायचं आहे. यापेक्षा “आनंदाचं शेत” काय वेगळं असणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here