स्वातंत्र्य मिळून इतके वर्षे उलटल्यावरही रस्ता नाही, महिलेची वाटेतच प्रसूती
पेढांबे दाबाडेवाडी येथे स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे उलटून अद्याप रस्ता झालेला नाही. साधारणपणे तीस घरं आणि दोनशे लोकांची या ठिकाणी वस्ती आहे. रस्ता नसल्याने येथे वाहन येत नाही. त्यामुळे आजारी माणसाला दवाखान्यापर्यंत नेणं जिकीरीचे होवून बसतं. शनिवारी रात्रौ येथील मनिषा संतोष शेळके या गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेदना होवू लागल्या. परंतु इतक्या रात्री पायवाटेने आणि आडवाटेने दवाखान्यापर्यंत नेणार कसं? हा मोठा प्रश्न होता. अखेर सकाळ झाली आणि काही ग्रामस्थांनी तिला डोलीतून दवाखान्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु अर्ध्या वाटेतच तिची प्रसूती झाली. दाबाडेवाडी ते मुख्य रस्ता असं साधारणपणे तीन किलोमीटरचे अंतर आहे. हा रस्ता करावा आणि इथल्या ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब गोरे यांनी केली आहे.
www.konkantoday.com