
कर्नाटकातील एसटी बसने उलटून घेतला पेट; पादचार्याला वाचवताना बस उलटली ओढ्यात, चालकासह आठ जण जखमी
साखरपा : रस्त्यावरून चालणार्याला वाचवताना एसटी रस्त्याशेजारील ओढ्यात पडली आणि तिने पेट घेतला. या अपघातात चालकासह आठ प्रवासी जखमी झाले. कर्नाटक राज्याची एसटी बस (केए 22 एफ 2065) रत्नागिरी येथून बेळगाव येथे जात होती. या गाडीवर चालक म्हणून बेळगाव आगाराचे माइनवार तर वाहक म्हणून अंबरिष बाघेली हे कार्यरत होते. मुर्शी येथील जाधववाडी एसटी थांब्याजवळ आल्यावर रस्ता ओलांडणार्या पादचार्याला वाचवताना चालकाचा एसटीवरील ताबा सुटला. बस डावीकडे रस्त्याच्या बाजूला उलटली. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या ओढ्यात बस कोसळली आणि बसने अचानक पेट घेतला. डिझेल टाकी पेटल्याने बस पेटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या आगीत बस जळून पूर्ण खाक झाली आहे. बसमध्ये असलेल्या तेरा प्रवाशांनी बसमधून बाहेर येत स्वतःची सुटका करून घेतली. यात चालक आणि अन्य सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. मुर्शी पोलिस दूरक्षेत्रातील पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. साखरपा एसटी स्थानकातील कर्मचार्यांनी मदतकार्य केले. अधिक तपास पोलिस करत आहेत.
