कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांसाठी सोय होणार, नगरपालिका रुग्णालयाचा वापर लवकर सुरु करा- उदय सामंत
नगरपालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या मजगाव रोडवरील रुग्णालय इमारतीत शक्य तितक्या लवकर रुग्णांना सेवा देण्याचे काम आरोग्य विभागाने सुरू करावे, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिले. याठिकाणी कोव्हीड-19 वगळता इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार होतील असे नियोजन करा असेही ते म्हणाले.मजगाव रोडवर नगरपालिकेतर्फे रुग्णालयासाठी बहुमजली इमारत पूर्णपणे बांधून तयार आहे. या इमारतीची पाहणी मंत्री उदय सामंत यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलापुरकर, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे आदींची उपस्थिती होती.जिल्हा सामान्य रुग्णालयाला कोराना रुग्णालयात रूपांतरित करण्यात आले आहे. यामुळे इतर रुग्णांवर येथे उपचार करण्यात अडचणी आहेत. हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने ही इमारत वापरण्यास घ्यावी व येथे साधन सुविधांसह प्रथम ओपीडी सुरू करावी असे सामंत म्हणाले.या चार मजली इमारतीत ओपीडीसह शस्त्रक्रिया तसेच रुग्णांसाठी वार्ड देखील सुरू करता येणार आहेत. या ठिकाणी त्यास्वरूपाची खोल्यांची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच वीज व पाणीपुरवठा ही या ठिकाणी सुरु आहे. या ठिकाणी आवश्यक त्या डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्गाची व्यवस्था केल्यास येथे रुग्णसेवा सुरू होणार आहे. मुख्य जिल्हा रुग्णालयात पासून दूर असल्याने व नगरपालिका हद्दीत असल्याने कोरोनाचा धोका टाळून येथे पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुरू करण्याची गरज होती त्यासाठी या इमारतीचा वापर होणार आहे.
www.konkantoday.com