थेट गाडीने नेपाळला जाण्याऐवजी रेल्वेने जाणेच साेयीस्कर
रत्नागिरी, ता. 27 ः कोकणातील आंबा बागांमध्ये काम करणार्या नेपाळच्या गुरखा मजुरांना थेट नेपाळपर्यंत गाडीतून पाठवण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु विविध राज्यांमधून जाताना त्या त्या राज्यांच्या लॉकडाऊनच्या नियमानुसार तपासणी, चौकशी, क्वारंटाईन होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी केंद्र, महाराष्ट्र व उत्तर प्रदेश सरकारने बनवलेल्या योजनेनुसार गुरखा मजुरांनी रवाना होणे सोयीचे ठरणार आहे.
साधारण ऑक्टोबरमध्ये 10-12 हजार गुरखा मजूर कोकणात दाखल झाले. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा बागांच्या रखवालीसह गरजेनुसार बागेतील आंबा काढणी, फवारणी, पेट्या भरणे आदी सर्व कामांसाठी गुरखा मजूर काम करतात. कोविड 19 मुळे त्यांना परत मायदेशी जाण्यासाठी कोकण रेल्वेने विशेष गाडी साडेावी, अशी मागणी यापूर्वी भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी केली आहे. त्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. अनेकांनी बाळ माने यांच्याकडे गुरखा मजूरांची माहितीसुद्धा दिली आहे.
काही बागायतदार लोक थेट नेपाळपर्यंत गाडीतून गुरखा मजूरांना सोडण्याची व्यवस्था करत आहेत. त्याकरिता 8 ते 10 हजार रुपये प्रत्येक मजुराला खर्च येणार आहे. परंतु नेपाळ सीमेपर्यंत जाण्याकरिता कोकणातील काही राज्यांच्या हद्दीमध्ये प्रवेश करून जावे लागणार आहे. त्या त्या राज्यांच्या वाहतूक व कोरोना उपाययोजना, क्वारंटाईन, नियम, अटी यामुळे प्रवासादरम्यान अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे रेल्वेने जाऊन तिथून पुढे जाणे सोयीस्कर पडणार आहे. कोणतीही अडचण असेल जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस ठाणे किंवा तहसीलदार कार्यालय येथे संपर्क करता येईल. रत्नागिरीतून दुसर्या राज्यात जाण्याकरिता शासनाने दिलेल्या लिंकवर नोंदणी करावी. https://forms.gle/g4yi1DHK5eijGphQ6