आता इएमआयवर मिळवा जेवण, रत्नागिरीच्या सुपुत्राची भन्नाट शक्कल!
आपण नेहमीच घराचे, गाडीचे, मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू या इएमआयवर घेत असतो. अशा इएमआयची आपल्याला सवयही झालेली असते. मात्र आता हॉटेलमधील जेवणही इएमआयवर मिळेल अशी कल्पना आपण कधी केली होती का? पण ही कल्पना सत्यात उतरवली आहे रत्नागिरीचे सुपुत्र व कोल्हापूर स्थित हॉटेल व्यावसायिक गणेश माने यांनी.
गणेश यांचे कोल्हापुरात हॉटेल म्हावरा या नावाने कोकणी मत्स्य खाद्यपदार्थांसाठी अत्यंत प्रसिद्ध असे हॉटेल आहे. एरवी या हॉटेलमध्ये कोकणची मत्स्य थाळी चाकण्यासाठी नेहमी गर्दी उसळत असते. या म्हावरा हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे आईच्या हातचा बनविलेला खास चविचा मसाला. त्यामुळेच या चविच्या प्रेमात अनेक कोल्हापुरकर पडले आहेत. परंतु आता लॉकडाऊनमुळे व कोरोनाच्या सद्य परिस्थितीमुळे हॉटेल व्यावसाय बंद आहे परंतु लोकांची सोय व्हावी यासाठी होम डिलिव्हरीची सुविधा देण्यात आली आहे. असे असले तरी कोरोनामुळे सगळ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. हॉटेलमधील पदार्थांची चव तर चाखायची आहे पण खिशात सध्या पैसे कमी आहेत, अशी लोकांची अडचण होती. ही अडचण लक्षात घेवून हॉटेल म्हावराचे मालक गणेश माने यांनी एक भन्नाट शक्कल लढवली ती म्हणजे इएमआयवर जेवण पुरवण्याची.
या योजनेत भाग घेणार्याला ती व्यक्ती कोल्हापुरातील स्थायिकच असावी लागणार आहे. तसेच कमीत कमी २००० रुपयांची ऑर्डर द्यावी लागणार आहे. म्हणजे समजा एखाद्याने २ हजारची ऑर्डर दिली तर त्याला पुढील तीन महिन्यात तीन हप्त्यात हे पैसे मोजावे लागणार आहेत. याशिवाय ग्राहकांशी असलेल्या संबंधांवरही हा इएमआयचा हप्ता कमी जास्त होवू शकतो. असे हॉटेल म्हावराचे मालक गणेश माने यांनी सांगितले.
ही योजना आणण्याचे कारण म्हणजे सध्या असलेली परिस्थितीतही ग्राहकांचा विचार आम्हाला करावासा वाटला. यामुळे ग्राहकाला हॉटेलमधील जे पदार्थ चाखायची इच्छा आहे तेही ते चाखू शकतील आणि त्यांच्यावर आर्थिक भार पडणार नाही. त्यामुळे या आमच्या नव्या इएमआय योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जर ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम मिळाल्यास या अटींपैकी काही अटी शिथिल होवू शकतील असेही त्यांनी सांगितले. आता महाराष्ट्रात नव्याने प्रयोग करणार्या गणेश माने यांच्या या उपक्रमाला कोल्हापुरकर कसे प्रतिसाद देतील हे लवकरच कळेल.
गणेश माने हे मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर-आंबव येथील असून त्यांचे शिक्षण रत्नागिरीत झाले आहे. नवीन व्यवसायाचे आव्हान व कोकणी पदार्थांची चव अन्य जिल्ह्यातील लोकांना चाखता यावी म्हणून त्यांनी कोल्हापुरात जावून हॉटेल म्हावरा सुरू करून कोल्हापुरकरांना कोकणी पदार्थं चाखण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.