
केळशी गावातील एका युवकावर जंगलामध्ये टेम्पोमध्ये राहण्याची वेळ
लॉकडाऊनच्या काळात दुसऱ्या तालुक्यातून गावात आलेला असल्यामुळे ग्रामस्थांनी गावात राहण्यास आक्षेप घेतल्याने तालुक्यातील केळशी गावातील एका युवकावर जंगलामध्ये टेम्पोमध्ये राहण्याची वेळ आली असून गेली चार दिवस हा रिक्षा टेम्पो त्यांच्यासाठी घर बनले आहे.
केळशी कुंभारवाडा येथील साहिल तळदेवकर हा युवक खेड येथे नोकरीकरीता असतो. त्याचे कुटुंब केळशी येथे राहते. लॉकडाऊनच्या काळात हा युवक खेड येथून आपल्या गावी आल्यावर त्याच्या घरी राहण्यावर वाडीतील लोकांनी आक्षेप घेतला. यानंतर वाडीची बैठक बसली बैठकीमध्ये या युवकाच्या भावाला जर तुमच्या घरात वेगळे संडास-बाथरूम वापरण्याकरीता असेल तरच याला वाडीत ठेवा असा निर्णय सांगण्यात आला. तसेच हा निर्णय गावचा असल्याचे सांगण्यात आले. नाईलाजाने या युवकाला वाडीतून बाहेर पडावे लागले. मात्र त्यांचे गावात अन्य घर नसल्याने त्याला गावातील एका जंगलात टेम्पोमध्ये राहण्याची वेळ आली. येथे त्याला दररोज जेवणासाठी डबा व पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येते. मात्र अन्य कोणतीही सुविधा जंगलामध्ये नसून साधा लाईट देखील नसल्याने रात्री मच्छर फोडून काढतात असे या युवकाने सांगितले.
याबाबत केळशी कुंभारवाडा वाडीअध्यक्ष संतोष खेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वस्तुस्थिती मान्य केली. मात्र सदर युवक सध्या कुठे आहे याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगितले. गावच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे आपण वाडीमध्ये हा निर्णय घेतला. मात्र आपण सदर युवकाला जंगलात राहण्याचा सल्ला दिलेलानाही असे देखील ते यावेळी म्हणाले. या घटनेमुळे तालुक्यातील माणुसकी आता हळू हळू लोप पावत चालली असल्याचे समोर आले आहे.
www.konkantoday.com