कोरोनाच्या मुकाबल्यासाठी प्रशासन खंबीर
रत्नागिरी दि. 12 : कोव्हीड – 19 विषाणू अर्थात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हयात परिस्थिती पूर्णपणे सकारात्मक पध्दतीने हाताळण्यात येत असून नागरिकांच्या सहकार्याच्या बळावर या आपत्तीचा मुकाबला करताना प्रशासन खंबीर असल्याचेही गेल्या 54 दिवसांच्या काळात सिध्द झाले आहे. यापुढील काळातही याच पध्दतीने सर्वांच्या सहकार्यातून संकटावर मात करु असा दृढनिश्चय प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी न भुतो न भविष्यती परिस्थिती निर्माण झाली आहे.उपलब्ध साधन क्षमतेचा वापर करुन जिल्हयात कोरोनाचा प्रसार रोखण्याचे काम अविरत चालू आहे. यासाठी देशस्तरावर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे. याचीही अंमलबजावणी जिल्हयात कोटेकोरपणे सुरु आहे. जिल्हयात पहिला रुग्ण श्रृंगारतळी (ता. गुहागर) येथे आढळला होता. त्यानंतर संभाव्य स्थिती लक्षात घेऊन वेगाने पावले उचलण्यात आली. सदर रुग्ण जिल्हयाबाहेरुन आलेला होता व उपचारानंतर तो बरा झालेला आहे. नंतरच्या काळात परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने मार्च अखेर नियोजन निधी परत न जाऊ देता साधारण 7 कोटींचा निधी आरोग्य यंत्रणा बळकट व्हावी यासाठी उपलब्ध करून दिला. यातून अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे, औषधांच्या खरेदीत मोठी मदत झालेली आहे.
कठोर उपाययोजना जिल्ह्यात या काळात 1130 नागरिक विदेश प्रवास करून आले. त्या सर्वांना क्वारंटाईन करुन त्यांची वेळोवेळी तपासणी व निरीक्षण या माध्यमातून लक्ष ठेवण्याचे काम महसूल व आरोग्य यंत्रणेने पार पाडले आहे. या सर्वांचा 28 दिवसांचा क्वारंटाईन अवधी पार पडलेला आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात 3 मे रोजी काही प्रमाणातील शिथिलता देण्याचे धोरण निश्चित झाले. जिल्ह्याचे वर्गीकरण (कमी रुग्ण संख्या आधारावर) ऑरेंज झोन मध्ये झाले. साधारण या घोषणेपुर्वी मुंबईतून जिल्ह्यात विविध मार्गाने नागरिक दाखल होण्यास सुरुवात झाली होती. जिल्ह्याच्या सीमा बंद असतानाही काही जण छुप्या मार्गांनी जिल्ह्यात आले. अशा सर्वांचा शोध घेऊन त्यांना सर्वांना संस्थात्मक पद्धतीने क्वारंटाईन करण्यात आले. कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी आलेल्या प्रत्येकाची स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यात काही प्रवासी रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान जिल्ह्यात मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयाला कोव्हीड रुग्णालयात रूपांतरित करून 400 खाटांची सुसज्ज व्यवस्था करण्यात आलेली आहे. शासन व कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून व्हेंटीलेटर खरेदी व खाजगी डॉक्टरांशी करार आदी पार पडले असून येणाऱ्या काळातील आव्हानांचा मुकाबला करण्याची पूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे. लॉकडाऊनची घोषणा अचानक झाल्याने शिमग्याच्या सणासाठी आलेले अनेक चाकरमानी येथेच अडकले. त्यात कारखाने व इतर व्यवहार बंद झाल्याने बाहेरील प्रांतातील मजुरांच्या हाताला काम नव्हते. या मजुरांसाठी जिल्ह्यात साधारण 178 शिबिरांच्या माध्यमातून काहींच्या निवासाची तर साधारण 15 हजार मजुरांच्या आतापर्यंतच्या दररोज दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था प्रशासकीय यंत्रणा व एनजीओच्या सहकार्यातून झालेली आहे. त्यानंतर त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शासनाचे निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या कार्यक्षेत्रातील तसेच ग्रामीण भागातील कारखाने व लघउद्योग यांना सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली. शासनातर्फे परवानगी मिळताच नजिकच्या जिल्ह्यात एसटीची सेवा सुरू करून काही परवानगी प्राप्त नागरिकांना जाण्याचा मार्ग खुला झाला. आजच साधारण 600 मजूर खास बसेसने पनवेल कडे रवाना झाले. त्यांना तेथून मध्यप्रदेश ला जाण्यासाठी रेल्वे व्यवस्था करण्यात आलेली आहे. येत्या दोन दिवसात याच पद्धतीने झारखंड राज्यातील मजुरांची रेल्वे निघणार आहे. तामिळनाडू राज्यातील मजुरांची व्यवस्थाही येथे 4 दिवसात होत आहे. त्यांना पूणे मार्गे रेल्वेने पाठविण्यात येणार आहे. जिल्हा ऑरेंज मधून ग्रीन झोन मध्ये आणण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्यात येत आहेत आणि प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस दल यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. अर्थात या सगळया प्रक्रियेत लोकप्रतिनिधी व नागरिक यांचे योग्य ते सहकार्य व योगदान मिळत आहे. हे येथे आवश्यक नमूद करावेसे वाटते.