प्रेयसीला मुंबईला नेताना प्रेमवीर झाला तिच्यासह क्वारंटाईन
प्रेमा पुढे कोरोनाची भीती बाळगली नाही की लॉकडाऊनची! असाच एक प्रेमवीर चालत मालवणला पोहोचला आणि प्रेयसीला परत आणताना लांजा पोलिसांच्या हाती सापडला. त्याला लांजात क्वारंटाईन करण्यात आले आहे.मुंबईत असलेल्या या प्रेमवीराचे सिंधुदुर्गातील मुळच्या मालवण येथील एका तरुणीसोबत प्रेम फुलत असतानाच कोरोनाचा शिरकाव झाला आणि देशात लॉकडाऊन करण्यात आले.या तरुणाने अखेर टोकाचे पाऊल उचलत चालत मालवण गाठले. या प्रेमवीराचा खटाटोप होता तो तिच्यासह मुंबईला घेऊन जाण्याचा. त्याने केलेल्या नियोजनानुसार तो त्या तरुणीला भेटला. त्याचबरोबर तिला घेऊन तो मालवणहून निघाला. हे प्रेमवीर चालत मुंबईकडे निघाले असतानाच लांजा पोलिसांच्या हाती लागले आणि त्यांचा मुंबईला जाण्याचा बेत फसला.त्यांना लांजा येथेच सामूहिक संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. दरम्यान, मुंबईतील रेड झोनमधून आलेल्या या युवकाच्या संपर्कात ही युवती आल्याने तिच्या घरासह शेजारच्या तीन घरातील एकूण ३४ सदस्यांना आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले आहे.
www.konkantoday.com