
खानु येथे गोवा बनावटीची ८७ लाखांहून अधिक किंमतीची दारू जप्तस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे ची कारवाई.
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत असणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून गोवा बनावटी दारु व वाहने असा एकूण ८७ लाख ९३ हजार ७६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने १५ ऑक्टोबपासून संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्या अनषंगाने पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात चालणारे अवैध धंदे, कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार हे २६ ऑक्टोबर रोजी रात्रीपासून महामार्गावर पेट्रोलिंग करून वाहनाची तपासणी करीत होते. दरम्याने गोपनीय माहितीच्या आधारे २७ ऑक्टोबर रोजी गोवा ते मुंबई जाणाऱ्या महामार्गावरील वाहनांची तपासणी करीत असताना खानु गावातील ब्राम्हणवाडी या ठिकाणी २ चारचाकी गाड्या उभ्या असलेल्या दिसल्या. या गाड्यांचा संशय आल्याने त्यांच्या जवळ जावून त्यात असलेल्या इसमांकडे चौकशी करून दोन्ही गाड्यांची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटी दारुचे बॉक्स भरलेले दिसून आले. त्यानुसार दोन्ही गाडीचे चालक अक्षय चंद्रशेखर घाडीगांवकर (वय २९, रा.मालवण, जि. सिंधुदुर्ग) आणि विजय प्रभाकर तेली (वय ३२, रा. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) यांच्या ताब्यातून ८७ लाख ९३ हजार ७६० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी व अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस उप निरीक्षक श्री. गावडे, सहाय्यक पोलीस फौजदार पांडुरंग गोरे, पोहवालदार सुभाष भागणे, नितीन डोमणे, बाळू पालकर, शांताराम झोरे, विक्रम पाटील, अमित कदम, विवेक रसाळ, भैरवनाथ सवाईराम, प्रवीण खांबे, गणेश सावंत, सत्यजित दरेकर, अतुल कांबळे, दत्तात्रय कांबळे यांनी केली. या कारवाईवेळी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचे सहकार्य मिळाले.