कोकणचा कायापालट करण्यासाठी चाकरमान्यांनो कोकणात या
दुसरं लॉकडाऊन आता संपत आलय. ह्या वेळी जिथे जिथे बाजू आवाक्यात आली आहे तिथे थोडी शिथिलता येण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुणे सारखी मोठी शहरं अजुन किमान महिनाभर तरी आहे तशीच बंद असतील आणि ती बंद असणंच गरजेच आहे. आमच्या कोकणात आता थोडं थोडं हातपाय मारायला देतील असं चित्र आहे..
मुंबईतून जसे परप्रांतीय आपापल्या घरी परत निघून गेले.. तसेच आमचे चाकरमानी सुद्धा आता हे सगळं निवळून प्रवास सुरू झाले की मोठ्या प्रमाणात मुंबईतून कायमस्वरूपी कोकणात आपल्या घरी परत येण्याची शक्यता आहे. त्यातले पैसेवाले लोक सोडून ज्यांच्या छोट्या तात्पुरत्या नोकऱ्या आहेत.. हॉटेलात काम करणारा वर्ग..लोकांच्या घरी काम करणारी माणसं..खासगी हापिसात असणारी माणसं ह्या सगळ्या लोकांची संख्या हजारोंनी आहे..
आता ह्यांच्या ह्या नोकऱ्या भविष्यात कितपत टिकतील याची खात्री उरली नाही किंवा कदाचित टिकणार पण नाहीत. त्यामुळे ही सगळी चाकरमानी मंडळी पुन्हा आपल्या गावी मूळ घरी कायमची मुंबई सोडून येतील अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. कारण मुंबई आता पूर्वी सारखी राहणार नाहीये.
आता एवढी माणसं पुन्हा कोकणात काम धंदे सोडुन आल्याने मोठं मनुष्य बळ आपल्याकडे तयार होईल. मग त्यांनी करायचं काय?? त्यामुळे बहुतांश लोक ही पुन्हा शेतीकडे वळतील..शेती मध्ये नवे प्रयोग होऊ लागतील..नवीन व्यवसाय वाढीस येतील..कोकणात मोठ्या प्रमाणात आर्थिक गणित बदलू लागतील..वाईटातून चांगलं घडेल आणि कोकणचा कायापालट होईल..अर्थात हे सगळं व्हायला किमान दोनेक वर्ष लागतील..
कोकणात करण्यासाठी बरच आहे..शेती आहे..पर्यटन आहे..फळ प्रक्रिया उद्योग आहेत..मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्रीज आहेत..शिवाय आंबा आणि मासे आहेतच..पण हे करायला आमच्याकडे आजवर माणसं नव्हती..ती आता येतील..आणि मोठा व्यापार तयार होईल..
काय सांगावं..ही या लोकांना आपल्या घरी परतण्याची आलेली संधी त्यांच्या आयुष्याला आणि पर्यायाने आपल्या कोकणाला एक वेगळं वळण देईल..नवं रूप देईल..
तसा अजुन मॉप टाइम आहे..असुदे..
पण आपल्याला आशावादी राहायला काय हरकत आहे??