तमसो मां ज्योतिर्गमय…..!

0
734

साधारणपणे संकटाचा कालावधी लवकर सरत नाही आणि आनंदाचा कालावधी जराही उरत नाही. मानवी मनाच्या साधारण भावना या प्रकारे काम करीत असतात. सकारात्मक ऊर्जेसाठी प्रयत्न करावे लागतात. नकारात्मक बाबी मात्र सहज पसरत पसरतात, अशा स्थितीत संकटांचा मुकाबला करणाऱ्यांना सकारात्मक ऊर्जेची अधिक आवश्यकता असते आणि अशी ऊर्जा प्रत्येकाला स्वतः मधून मिळवावी लागते.

तमसो मां ज्योतिर्ग्यमय नकारात्मकतेचा अंध:कार घालवायचा तर त्याला तेजाने उत्तर दिलं पाहिजे. इवल्याश्या ज्योतीने तिमिराला सारण्याची ताकद असते. अर्थात हे प्रतिकात्मक स्वरूप म्हणता येईल, यालाच आपण अंतरंगात प्रज्वलित करून नैराशाचा अंधार दुर सारायचा. संकटसमयी अंधार हे देखील एक प्रतीकच. आपण आनंदी असतो आणि सकारात्मक ऊर्जा भरून वाहते. त्यावेळी आपणाला अगम्य भविष्याची चिंता नसते, भविष्याच्या गर्भात काय मांडून ठेवले आहे हा विचार देखील मनाला शिवत नाही. आलेला प्रत्येक जण जाणार याची जाणीव ठेवून जगताना सकारात्मता त्या मृत्यूची अनामिक भीती झुगारून टाकत असते. चिता जाळी शरीर आणि चिंता जाळी मन असं म्हणतात. संकट येतात त्यावेळी मनात नकारात्मक विचारांचे वादळ सुरु होते. वैरी जे न चिंती ते मन चिंती या उक्तीची अनुभूती आपणास येते. नाही नाही ते टोकाचे विचार मनात येतात आणि एकटेपणात आपण त्या नकारात्मक विचारांच्या गुंत्यात अडकत जातो. त्यावेळी अशा एखाद्या आशेच्या किरणाने आपल्याला पुन्हा जगण्याचं भान प्राप्त होतं. ती सकारात्मक ऊर्जा इवल्याशा ज्योतीच्या माध्यमातून मिळते. नकारात्मकते कडून सकारात्मकतेकडे होणारा प्रवास नैराश्यातून काढण्यासह आयुष्याला उभारी देण्याचं काम करतो. जागतिक आरोग्य संघटनेने मागील वर्षी याच कारणासाठी डिप्रेशन वर लक्ष केंद्रित करून उपक्रम घेतले. आयुष्याची किती गती यंत्रांनी वाढवली आहे आणि आयुष्य धकाधकीचं झालं आहे. यातून अनेक जण या डिप्रेशन नावाच्या मनोविकार अडकले आहेत असं चित्र दिसत होतं. कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर समस्त जनता काम सोडून घरात आहे. या दहा दिवसांनी आयुष्याला बरच काही नव्याने मिळालय. गती थांबली असली तरी आयुष्य थांबलेलं नाही. गतीचा बुडबुडा या लॉकडाऊनने फोडला आहे. कधीतरी शांतपणे काही काळ आयुष्य जगणं आवश्यक आहे. भोगवादी वस्तूंची खरेदी आणि बडेजाव मोठा नसून आयुष्य मोठं आहे हे महत्त्वाचं आहे. जंकफूड पेक्षा पौष्टीक अन्न महत्वाचं आहे. आपल्या नेमक्या गरजा काय आहेत आदींचं मंथन यानिमित्ताने होताना दिसत आहे. नकारात्मकता अफवा पसरवित असतील तर त्या क्षणी सजग होऊन सत्य-असत्य तपासणं गरजेचं आहे. आपली एकट्याची सकारात्मकता यावर मात करू शकते तर समुहात्मक सकारात्मकतेतून निर्माण होणारी उर्जा अधिक काम करेल आणि म्हणूनच म्हणतात प्रार्थनेत शक्ती आहे आणि मग ती प्रार्थना धर्मांच्या पलीकडली संकल्पना आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सारं विश्व थांबलय आणि प्रत्येकाचं अंतरंग ढवळून निघालय. या अंतःकरणाच्या सागर मंथनातून नवा संदेश घेऊन याच संकटाचा मुकाबला करण्यासाठी समूह रुपानं उभं राहायची ही वेळ आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलय दुरितांचे तिमिर जावो...!

प्रशांत दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here