
परबांच्या रिसॉर्टवर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक कारवाई का करत नाहीत?
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा रत्नागिरीत सवाल
रत्नागिरी : परिवहनमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांचे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे हे जिल्हाधिकार्यांसह राज्य सरकारलाही माहीत आहे.तरीही रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक कारवाई करत नाहीत. परंतु फौजदारी कारवाई झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असा इशारा भाजपाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत दिला. सोमवारी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांची भेट घेऊन सोमय्या यांनी निवेदन दिले. याप्रकरणात फौजदारी कारवाई करण्यासाठी त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी विविध मुद्दे पत्रकारांसमोर मांडले. जोपर्यंत अॅड. परब यांच्यावर फौजदारी कारवाई होत नाही तोपर्यंत आपण पाठपुरावा करत राहणार आहोत. केंद्र सरकारच्या आदेशामुळे जिल्हा प्रशासनाला 90 दिवसांत रिसॉर्ट पाडावे लागेल, असेही सोमय्या म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, अॅड. विलास पाटणे, अॅड. बाबासाहेब परुळेकर, शहराध्यक्ष सचिन करमरकर, नगरसेवक उमेश कुलकर्णी व भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.