
सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगावर ताशेरे
__राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाची कानउघाडणी केली. निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे अजित पवार गटाला मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली. त्यावर बोट ठेवत सुप्रीम कोर्टाने १०व्या परिशिष्टाची आयोगाला आठवण करून दिली.बंडखोरी केल्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्हावर दावा केला होता. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मान्यता दिली. या निर्णयाला शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्ननाथन यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाबद्दल प्रश्न उपस्थित केले. “राजकीय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीच्या आधारे नव्हे, तर केवळ विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारावर मूळ पक्ष कुणाचा हे निवडणूक आयोग ठरवत असेल, तर निवडणूक आयोग पक्षातील फूट मान्य करत नाही का?”, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाची कानउघाडणी केली. www.konkantoday.com