रत्नागिरीतील 10 सायकलपटू करणार रत्नागिरी ते गोवा प्रवास रत्नागिरी सायकल क्लब, विरश्रीचे आयोजन; सशक्त कोकण प्रदूषणमुक्त कोकण साठी करणार जनजागृती

0
57

रत्नागिरीतील नागरिकांना सायकलिंगचे महत्त्व पटवून दिल्यानंतर आता वीरश्री ट्रस्ट आणि रत्नागिरी सायकलिंग क्लब ‘सशक्त कोकण प्रदूषणमुक्त कोकण’ करण्याच्या निर्धाराने सायकलवरून रत्नागिरी ते गोवा असा प्रवास करणार आहे.
ही माहिती वीरश्री आणि सायकलिंग क्लबचे अध्यक्ष डॉ निलेश शिंदे यांनी दिली. 2018 मध्ये वीरश्री ट्रस्टने रत्नागिरीत सायक्लोथॉनचे यशस्वी आयोजन केले. सायकल चालवण्याची आवड प्रत्येकालाच असते. परंतु हीच आवड आपल्या आणि आपल्या परिसराच्या उत्तम तब्येतीला सुद्धा महत्वाचे योगदान देते हा संदेश वीरश्री ने रत्नागिरीकराना दिला आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 2018 ला पहिले सायक्लोथॉन यशस्वी झाल्यानंतर सायकलस्वारीचे महत्त्व जाणणाऱ्या सायकलपटूनी एकत्र येऊन आम्ही सायकल क्लबची स्थापना केली. वर्षभर आम्ही रत्नागिरी आणि परिसरामध्ये सायकलस्वारी केली असून या निमित्ताने वेगळ्या रत्नागिरीची ओळख सुद्धा झाली. आपली रत्नागिरी किती सुंदर आहे आणि तिला प्रदूषणापासून दूर ठेवले पाहिजे याची जाणीव झाली असे डॉ. शिंदे म्हणाले.
डिसेंबर 2019 ला रत्नागिरीत दुसरे सायक्लोथॉन पार पडले आणि त्याला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इथले लोक जागरूक होताना दिसत आहेत. मात्र हीच जनजागृती संपूर्ण कोकणात व्हावी आणि कोकण सुद्धा प्रदूषणमुक्त व्हावे यासाठी आम्ही रत्नागिरी ते गोवा असा 282 किमी चा प्रवास सायकलवरून करणार आहोत.
रविवारी 12 जानेवारीला आमच्या प्रवासाला धनवंतरी रुग्णालयापासून सुरुवात होईल. यात रत्नागिरीतून डॉ. निलेश शिंदे, डॉ. तोरल शिंदे, डॉ निशिगंधा पोंक्षे, कल्पेश चव्हाण, विनायक पावसकर, डॉ. नितीन सनगर, मंगेश शिंदे, माधव काळे, सौ. निमा काळे, किरण चुंबळकर सायकलपटू सहभागी होणार आहेत. पहिल्या दिवशी पावस, पूर्णगड, आडिवरे, धारताळे, नाटे, जैतापूर, कातरादेवी मंदिर, जामसंडे करून देवगड येथे पहिल्या दिवशी राहणार आहोत. पहिल्या दिवशी 101. 2 किमीचा आमचा प्रवास होईल. दुसऱ्या दिवशी देवगड हुन निघून मीठ बाव, मालवण, चिपी विमानतळ, परुळे यामार्गे वेंगुर्ले येथे पोहोचू. हा आमचा प्रवास 106.5 किमी होईल. तर तिसऱ्या दिवशी वेंगुर्ले येथून निघून मोचेमाड, शिरोडा मार्गे आम्ही करमाळी, गोव्यात पोहोचू. तेथे आमचा प्रवास ओल्ड गोवामध्ये असेल. हा प्रवास 77 किमीचा आहे.
दि 15 जानेवारीला तेजस रेल्वेने आम्ही रत्नागिरीत परतणार आहोत असे डॉ शिंदे यांनी सांगितले. यामध्ये 10 सायकलपटू भाग घेणार आहेत. हा एक वेगळा अनुभव असेल. सायकलचे महत्व सर्वाना समजावे यासाठी आमचा प्रयत्न असेल असेही ते म्हणाले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here