राष्ट्रउभारणीच्या कार्यात प्राध्यापकांचा पुढाकार नाही हभप चारुदत्त बुवा आफळे यांची खंत

रत्नागिरी : देशद्रोहाची भावना शिकवणाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रउभारणीच्या कार्यामध्ये प्राध्यापकांचा कोणताही पुढाकार नसतो. कोणतेही प्रयत्न नसतात, अशी खंत राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी व्यक्त केली.येथे सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कीर्तनात आफळे बुवांनी निरूपणासाठी रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांमधील दीनानाथ हा राम कोदंडधारी हा श्लोक घेतला होता. त्याचे निरूपण करताना रामायण काळात राक्षसांचे आक्रमण परतवून लावण्यासाठी विश्वामित्र आणि वसिष्ठ ऋषींनी राज्याच्या रक्षणासाठी राज्यकर्त्यांचे कसे प्रबोधन केले होते, याचा आढावा बुवांनी घेतला. ते म्हणाले की त्याकाळी गुरुस्थानी असलेल्या हट्टाग्रही ऋषीमुनींनी कडक आणि कर्मठ निर्बंध सांभाळून उपासना करत असतानाच रामासारख्या त्याकाळच्या नव्या नेतृत्वाला सबळ करणे, रणांगणावर उभे करणे यासारखे कार्य केले. त्यामुळे ऋषींची आध्यात्मिक सिद्धता कोठेही कमी झाली नाही. सध्याच्या विद्यापीठांमध्ये देशद्रोहाची भावना शिकविण्याचे प्रयत्न दहा-दहा वर्षे सुरू आहेत. त्याचे समर्थन करण्यासाठी देशभरातील विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्याचे काम वक्ते करत आहेत. पण या विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्माण करण्यासाठी प्राध्यापकांकडून कोणतेही प्रयत्न होत नाहीत. चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांकडे वक्ते भरपूर आहेत. पण चांगला विचार लोकांपर्यंत नेण्यासाठी तसे प्रवक्तेच नाहीत. याचा परिणाम देशाला भोगावे लागत आहे
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या पुस्तिकेच्या विरोधात रत्नागिरीत गुरुवारी (दि. ९ जानेवारी) रत्नागिरीत स्वातंत्र्यलक्ष्मी चौकात निदर्शने करण्यात आली. त्यावेळी कोणतीही भक्तमंडळे किंवा उपासना मंडळे सावरकरांचा अपमान करणार्यां्च्या विरोधात निषेध करण्यासाठी फलक घेऊन आली नाहीत. अशाच भक्त मंडळांच्या सद्गुरूचा वाढदिवस असेल तर ८० हजार लोक जमतील, पण राष्ट्रीय अवमानाचा विरोध करण्यासाठी आठशेसुद्धा लोक जमत नाहीत. देशाबद्दल आस्था नसल्याचेच हे लक्षण आहे. त्यामुळेच भारताचा अवमान होत आहे, असेही आफळे बुवा म्हणाले.
`कीर्तनसंध्या` महोत्सवात दुसऱ्या दिवशी योद्धा भारत या आख्यानविषयाच्या अनुषंगाने बुवांनी कीर्तनाच्या उत्तररंगात १९६२ साली चीनविरुद्धच्या लढाईत भारताला पत्कराव्या नामुष्कीजनक पराभवाचे विश्लेषण केले. लेफ्टनंट जनरल कौल यांनी लिहिलेले `अनटोल्ड स्टोरी`, श्याम चव्हाण यांचे `वॉलोंग` अशा पुस्तकांचा आधार घेऊन आफळेबुवांनी १९६२ सालचे युद्ध श्रोत्यांसमोर उभे केले. भारतीय बुद्धधर्माचा चीनमध्ये झालेला प्रसार हे कारण पुढे करून चीनने भारताशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. `हिंदी-चिनी भाई भाई` म्हणून या संबंधांचा उल्लेख तेव्हा करण्यात आला. शांततेचा पुरस्कार करणारे चीन आणि जपानसारखे देश स्वतः मात्र नवनव्या शस्त्रास्त्रांनी सज्ज होत होते. भारत त्याबाबतीत मागे होता. अशा स्थितीत शांततेचा अग्रदूत होण्याच्या स्वप्नरंजनात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू रमून गेले होते. त्यामुळे चीनकडून होणाऱ्या कारवायांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. सेन, थापर इत्यादी तेव्हाचे लष्करप्रमुख नेहरूंना या कारवायांची माहिती देत. मात्र भारतीय सैन्याची धास्ती जगाला वाटू नये, याची काळजी घेण्याचा सल्ला नेहरूंकडून सैन्याला दिला जात होता. याच स्थितीची गैरफायदा घेऊन चीनने भारताचा तिबेट हा प्रांत जिंकून घेतला. मात्र मैत्री आणि बंधुभावाच्या नात्याचा उल्लेख करत भारताने साधा निषेधही तेव्हा व्यक्त केला नाही. तिबेटला जोडणारा रस्ता बांधायला चीनने १९५५ साली सुरुवात केली, १९५७ साली त्याचे उद्घाटन झाले. त्याद्वारे आणि तोफा दारूगोळा भारताच्या सीमेपर्यंत आणणे शक्य व्हावे, यासाठी हा रस्ता बांधला गेला होता, हे स्पष्ट होते. ज्या भागात गवतही उगवत नाही त्या तिबेटचा आग्रह का धरावा, असे निवेदन तेव्हा नेहरूंनी संसदेत केले होते. चीनने रस्ता बांधल्याने अतिक्रमण झाले, मात्र चीनकडून आक्रमण होईल असे वाटत नाही, असेही नेहरूंचे म्हणणे होते. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. पुढच्या पाच वर्षांनी २० ऑक्टोबर १९६२ रोजी चीनच्या सैन्याने सर्व सामर्थ्यानिशी भारतावर जबरदस्त आक्रमण केले. भारताची १२ ठाणी अवघ्या चार दिवसात जिंकून घेतली. नेफा प्रांत चीनने गिळंकृत केला. अपुरा आणि जुना शस्त्रसाठा तसेच अपुऱ्या साधनसामग्रीमुळे भारतीय सैन्याला चीनच्या सैन्याशी लढता आले नाही. आंतरराष्ट्रीय दबाव लक्षात घेऊन चीनने ‌दोन महिन्यांच्या युद्धानंतर एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली. मात्र तरीही लडाखचा बारा हजार चौरस मैलांचा प्रदेश चीनला द्यावा लागला, असे प्रतिपादन आपले बुवांनी केले.
चीनविरुद्ध १९६२ साली झालेल्या युद्धाच्या काळात सेनाधिकारी होशियार सिंग, सुभेदार जोगिंदर सिंग, शैतान सिंग, गुरखा पलटणीचे मेजर धन सिंग थापा, श्याम चव्हाण, विमान चालवत असताना शत्रुपक्षाची गोळी मांडीत लागल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेतही चीनचा ६०० बॉम्बगोळ्यांचा बॉम्बचा साठा नष्ट करणारे वैमानिक टकले, मेल्यानंतर आपल्या शरीराचा भार मशीनगनवर नेमका कसा राहील, याची काळजी घेऊन मरताना चीनचे एक हजार सैनिक मारणारे गोविंद कांबळे अशा सैनिकांच्या पराक्रमाची कहाणी आफळेबुवांनी ओघवत्या शैलीत, सुमधुर आणि शौर्यप्रधान गीतांच्या साथीने विशद केली.
कीर्तनाच्या पहिल्या दिवशीच्या निरूपणावर इतिहासावर आधारित प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या आदित्य महेश दामले, वेदांग महेंद्र पाटणकर आणि प्रथमेश उत्तम घाटे या विद्यार्थ्यांना आफळेबुवांच्या हस्ते पुस्तकभेट देऊन समारंभात गौरविण्यात आले.

……….
फोटो ओळी – रत्नागिरी – कीर्तनसंध्या महोत्सवात प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्याबद्दल आफळेबुवांच्या हस्ते पुस्तकभेट स्वीकारणारे विद्यार्थी.
……

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button