
लस दिली एक आणि प्रमाणपत्र मिळाले दुसरेच!अनिकेत पटवर्धन; लाभार्थ्यांना योग्य माहिती द्या
रत्नागिरी– शहरातील झाडगावसह अन्य ठिकाणच्या लसीकरण केंद्रांवर लस एका कंपनीची दिली व प्रमाणपत्र दुसर्याच कंपनीच्या लसीचे मिळाले, अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे यातील दोषींवर कारवाई करावी आणि हा गोंधळ थांबवा. लाभार्थ्यांना योग्य माहिती द्या अन्यथा दोन प्रकारच्या लसींमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी दिला आहे.
यासंदर्भात त्यांनी कागदपत्रांसह पत्रकारांना माहिती दिली. सावंत दांपत्याने व्यक्तीने 6 एप्रिल रोजी झाडगाव केंद्रात लस घेतली. ही लस कोव्हॅक्सिन असल्याचे प्रमाणपत्र त्यांना काही दिवसांत ऑनलाइन उपलब्ध झाले. त्यावर 28 दिवसांनंतर पुढची लस घ्यावी, असे म्हटले होते. परंतु आपण कोव्हिशिल्ड लस घेतल्याचे सावंत दांपत्याला माहिती होते. मग त्यांनी पुन्हा झाडगाव उपकेंद्रात डॉक्टरांशी संपर्क साधला. त्या वेळी ही लस कोव्हिशिल्ड होती व प्रमाणपत्र मात्र कोव्हॅक्सिनचे मिळाल्याचे लक्षात आले.
याबाबत अधिक माहिती घेता लसीचा आलेला साठा आणि लाभार्थ्यांचे नाव असा डेटा तयार करताना गोंधळ उडाल्याने त्या दिवशी लस घेतलेल्या शेकडो व्यक्तींना या समस्येला तोंड द्यावे लागले. त्यामुळे नेमकी लस कोणती घेतली याची माहिती प्रत्येक लाभार्थ्याने काळजीपूर्वक स्वतःकडे ठेवण्याची गरज आहे, असे अनिकेत पटवर्धन यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com