
लोकांकिका’ची विभागीय रंगभूमी ‘वन डे सेलिब्रेशन’ने गाजवली
‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेच्या विभागीय फेरीमध्ये एस्. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या ‘वन डे सेलिब्रेशन’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. या एकांकिकेने एकूण ५ बक्षिसे संपादन करत राज्य पातळीवरील अंतिम फेरीत धडक मारली आहे.
लोकांकिका या महाराष्ट्रातील अग्रगण्य नाट्यस्पर्धेची रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांची विभागीय फेरी स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात पार पडली. या फेरीसाठी गोगटे-जोगळेकर, अभ्यंकर-कुळकर्णी, केळकर महाविद्यालय, देवगड, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, महाड या महाविद्यालयांच्या एकांकिका अंतिम विभागीय फेरीसाठी पात्र ठरल्या होत्या. या फेरीमध्ये एस्. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाची ‘वन डे सेलिब्रेशन’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली.
तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आपल्या मुलाचे समलिंगी संबंध कळल्यानंतर बसलेल्या धक्क्यातून सावरत कालांतराने आईवडिलांनी घेतलेली वास्तववादी भूमिका एस्. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘वन डे सेलिब्रेशन’ या एकांकिकेतून धीटपणे मांडली.
या एकांकिकेला उत्कृष्ट लेखन, पार्श्वसंगीत, अभिनय पुरुष, दिग्दर्शन अशी प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळाली. उत्कृष्ट लेखनासाठी गणेश राऊत, उत्कृष्ट पार्श्वसंगीतसाठी दीपेन भोजे, उत्कृष्ट दिग्दर्शनसाठी किरण राठोड, उत्कृृष्ट अभिनयासाठी (पुरुष) स्वप्नील धनावडे आदींची निवड करण्यात आली. या यशाबद्दल नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, प्राचार्य डॉ. वामन सावंत,संचालिका सीमा हेगशेट्ये , सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. सचिन टेकाळे यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचार्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे
www.konkantoday.com