दापोली शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जलशुध्दीकरण केंद्रामध्ये आढळलेला मृत पक्षी

0
258

दापोलीः- दापोली नगरपंचायतीचा भोंगळ व बेजबाबदार कारभाराचा पर्दाफाश दापोली नगरपंचायतीचे पाणी पुरवठा सभापती श्री.प्रकाश साळवी यांनी करत दापोली शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जलशुध्दीकरण केंद्रातच पाण्यामध्ये पक्षी मरुन पडला असल्याचे पत्रकारांच्या निदर्शनास आणले असून या प्रकारानंतर दापोली नगरपंचायत प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.दापोली शहराला नारगोली व कोडजाई येथील धरणामधून पाणी पुरवठा केला जातो. या दोन्ही प्रकल्पातील पाणी काळकाई कोंड येथील जलशुध्दीकरण केंद्रामध्ये आणले जाते. दापोली नगरपंचायतीने सुमारे एक वर्षापूर्वी लक्षावधी रुपये खर्च करुन या केंद्राची दुरुस्ती केली. मात्र सध्याच्या स्थितीमध्ये या केंद्राची दुरावस्था झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ज्या विभागामध्ये पाणी फिल्टर करण्यात येते तेथील चक्र (पंखा) बंद असून त्यानंतर विविध भागांमध्ये जाणारे पाणी देखील कोणतीही प्रक्रिया न करता केवळ टीसीएल पावडरच्या आधारावर दापोलीकरांसाठी सोडले जात आहे.दापोली शहराला दर दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असून दापोली नगरपंचायतीमध्ये पाणीपुरवठा हा स्वतंत्र विभाग आहे. या विभागामार्फत कोडजाई, नारगोली, काळकाईकोंड येथे पाणी सोडण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचार्‍यांनी पाणी सोडतानाच त्यातील स्वच्छता देखील तपासणे गरजेचे असताना दापोली शहरातील काळकाई कोंड येथील जलशुध्दीकरण केंद्रात पाण्याच्या प्रवाहामध्ये कावळा सदृश्य पक्षी मरुन पडलेला पाणीपुरवठा सभापती श्री.प्रकाश साळवी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत पत्रकारांनाही सांगितले. त्यानंतर पत्रकारांनी याबाबत नगरपंचायत प्रशासनाला खातरजमा करुन विचारणा केली असता नगरपंचायत प्रशासनाने तेथे कबुतर मेले असून यापुढे असा प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे सांगितले.याबाबत पाणी पुरवठा विभागाचे सभापती व शिवसेनेचे गटनेते श्री.प्रकाश साळवी यांनी आपण या प्रकाराबाबत दापोली नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांना जाब विचारणार असून दापोली शहरातील नागरीकांच्या आरोग्याशी नगरपंचायत प्रशासन खेळत असून जर जलशुध्दीकरण केंद्रातच असे प्रकार घडत असतील तर जेथून पाण्याचा पुरवठा केला जातो तेथे काय परिस्थिती असेल अशी शंका व्यक्त करतानाच प्रशासनाने याबाबत खुलासा करावा असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here