
यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले परीक्षा घेण्याबद्दल आता फेरविचार नाही ,यूजीसीच्या गाईडलाईन्स या बंधनकारकच
परीक्षा घ्याव्यात हे विद्यापीठ अनुदान आयोगाकडून आज सांगितले जात नाही तर ते २९ एप्रिलपासून सांगितले जात आहे, असा प्रतिहल्ला यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी चढवला आहे. परीक्षा घेण्याबद्दल आता फेरविचार नाही. शिवाय यूजीसीच्या गाईडलाईन सर्व राज्यांना बंधनकारक आहेत
एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. पटवर्धन म्हणाले, आतापर्यंत आमची अपेक्षा होती की वेगवेगळ्या विद्यापीठांनी त्याची तयारी सुरू केली असेल. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जुलैमध्ये परीक्षा शक्य नव्हत्या म्हणून गाईडलाईन्स पुन्हा कराव्या लागल्या.आमच्याशी चर्चाच केली नाही हे आरोप चुकीचे आहेत. फेरविचार होऊ शकणार नाही. यूजीसीला हा संभ्रम आता संपवायचा आहे. केंद्रीय विद्यापीठे, राज्यातली अभिमत विद्यापीठे यांच्यासाठी तर यूजीसीच्या गाईडलाईन्स या बंधनकारकच आहेत. या प्रकरणात काही कोर्ट केसेसही झाल्या आहेत. कोरोनासारख्या अभूतपूर्व संकटात नव्या शैक्षणिक पद्धतीसाठी आपण तयार राहिले पाहिजे.
देशात काही विद्यापीठांनी परीक्षा घेतल्या देखील आहेत. शैक्षणिक जीवनात परीक्षा हा महत्त्वाचा भाग आहे. त्याची पूर्तता केल्याशिवाय एखाद्याला पदवी देणे योग्य नाही. विद्यार्थ्यांना तात्पुरता लाभ दिसत असला तरी त्यांचा भविष्यातला विचार करणे आवश्यक आहे. कोरोनाची मार्कलिस्ट त्यांना आयुष्यभर बाळगावी लागेल. सर्वांना विचारात घेऊन हा निर्णय घेतला आहे, असे डॉ. पटवर्धन म्हणाले. विद्यार्थ्यांनाच संभ्रमात टाकलं जात हे दुर्दैवी आहे. एमबीबीएसचा विद्यार्थी जर परीक्षा दिली नसेल तर आपण त्याच्याकडे उपचाराला जाणार का? इंजिनियरने परीक्षा दिली नसेल तर त्याने बांधलेल्या पुलाबाबत खात्री बाळगणार का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. काही विद्यार्थी परगावी गेले आहेत. त्यांचेही प्रश्न आहेत पण त्याबद्दल ही आपल्याला उपाय शोधता येतील, असे पटवर्धन म्हणाले. परीक्षेदरम्यान कोरोनाचा संसर्ग झाला तर यूजीसी जबाबदार आहे का? असे प्रश्न विचारणे योग्य नाही. आपण दारूची दुकान चालू करतो त्यावेळी हे प्रश्न विचारले का? असं डॉ. पटवर्धन म्हणाले.
विद्यापीठांना जी स्वायत्तता दिली आहे. त्याचा वापर कुलगुरूंनी केला तर त्यातून नक्की मार्ग काढता येईल. सप्टेंबरमध्ये ते शक्यच नाही असे आत्ताच म्हणण्यापेक्षा त्यासाठी किमान तयारी करत राहणे योग्य राहील. यूजीसीने आपला स्टँड बदललेला नाही. पण जे लोक संभ्रम निर्माण करत आहेत, त्यांनी विचार करावा आपण हे का करतोय, असे ते म्हणाले.
www.konkantoday.com